१.
कसे पाषाण झाले आठवत नाही
हृदय आता कुणाचे पाझरत नाही
ऋतूंनी त्या कळीला छेडल्यापासुन
अता पूर्वीप्रमाणे ती फुलत नाही
पुरावे शोधण्यासाठी किती खोदू?
जुन्या थडग्यात काही सापडत नाही
उन्हाची लागली आहे सवय आता
हवा ही पावसाळी सोसवत नाही
नभाला सांग ना वाकायला खाली
धरा कोमेजलेली पाहवत नाही
इथे जो तो स्वतःला मानतो ईश्वर
कुणी पण माणसाला ओळखत नाही
भवानी म्यान करुनी ठेवली शिवबा
तुझा भगवा कुणाला पेलवत नाही
२.
थांबलो होतो तसाही एकटा
चाललो होतो तसाही एकटा
टाकले खुडुनी मला त्यांनी कसे?
वाढलो होतो तसाही एकटा
केवढी स्वप्नात माझ्या शांतता
झोपलो होतो तसाही एकटा
मान्य झाले तेच मी जे बोललो
भांडलो होतो तसाही एकटा
जिंकलो शर्यत कशी मी आजची
धावलो होतो तसाही एकटा
मोकळी झालीस तेव्हा तू सहज
गुंतलो होतो तसाही एकटा
नेमकी शिक्षा मला त्यांनी दिली
भेटलो होतो तसाही एकटा
शोध तेथे राख माझी कोठली
पेटलो होतो तसाही एकटा
ते वितळले आणि गेले वाहुनी
गोठलो होतो तसाही एकटा
.......................................
संजय कुळये
रत्नागिरी
9860096030
मस्त
ReplyDeleteछान आहेत गझला!
ReplyDelete- विजयानंद जोशी.