दोन गझला : मधुरा गावकर

१.

जगण्याला ते  भार म्हणाले
मृत्यूला आधार म्हणाले

थोडासा घे श्वास मोकळा
बंद खणाला  दार म्हणाले

इतके  परकी  केले त्यांनी.
चक्क तुझे  आभार ! म्हणाले.

का झाला तो माझा शत्रू 
मी तर त्याला यार म्हणाले 

वाचुन  झाले नुसते वरवर
कळले नाही फार म्हणाले.

जाण नसावी बहुधा त्यांना
नात्याला व्यवहार म्हणाले

जगणे म्हटले  कुणी यातना
कुणी जन्म गुलजार म्हणाले.

२.

मातीवरती जीव कुणाचा जडला होता.. 
हात नभाचा कोणी  हाती धरला होता. 

जरा जराशी उमलत होती कळी बिचारी 
 कोणी  तेव्हा देठ नेमका खुडला होता..

कोणाला ना सवड मिळाली कोणासाठी.
ज्याचा त्याचा जीव स्वतःला विटला होता-... 

नाकारत मी गेले  होते असणे त्याचे
दुःखाचाही इगो त्यामुळे दुखला होता..

कुठे बोलणे झाले होते तसे आपुले.. 
प्रवास तेव्हा   मुक्यामुक्याने घडला होता.

..........................
मधुरा गावकर 
मु. असगणी, पोष्ट - रामगड.
ता. मालवण, जि. सिंधुदूर्ग

No comments:

Post a Comment