तीन गझला : सौ.दिपाली कुलकर्णी

१.

नोंदला गेला गुन्हा वाचाळ डोळ्यांवर
बिनबुडाचा घेतला का आळ डोळ्यांवर

लाख हृदये चोरली होती म्हणे त्यांनी
बोलली होती कुठे ती 'भाळ' डोळ्यांवर

स्वच्छ कर दृष्टीस, दृष्टीकोन बदलू दे
रोज मायेचे नवे जंजाळ डोळ्यांवर

रुक्ष तो, त्याच्यात ती का गुंतली इतकी
भाळली का सुंदरा घायाळ डोळ्यांवर

घातला जगण्यात गोंधळ दोन डोळ्यांनी
बोलणे आतातरी तू टाळ डोळ्यांवर

काढ तू चष्मा जुना अन् बघ नवी दुनिया
धूळ आहे केवढी पडताळ डोळ्यांवर

जे पुढे येणार ते दिसणार डोळ्यांना
एक पडदा तू, तुझा सांभाळ डोळ्यांवर


२.

पाळला नव्हता जगाचा एकही संकेत आपण
राहतो या कारणाने नेहमी चर्चेत आपण

काय होतो वा कसे ते ? ना खरे कळलो कुणाला
का कधी बसणार नव्हतो नेमक्या व्याख्येत आपण

वार बेसावध क्षणी करणार असतो गुप्त शत्रू
तीक्ष्ण चाकू एक सोबत ठेवतो बगलेत आपण

दैव नियतीने बदलले जीवनाचे मार्ग कायम
सर्व नामंजूर झाले आखलेले बेत आपण

उंच आकाशात मोठी घेतली आपण भरारी
ना कधी गर्दीत अथवा धावलो स्पर्धेत आपण

का तटस्थासारखा दुर्लक्षितो अन्याय सारा
मारली संवेदना अन् होत गेलो प्रेत आपण


३.

सहज दोघातले अंतर हसत मिटवून जाताना
सुगंधी व्हायचा वारा तुझ्या जवळून जाताना

कितीदा टाळली मी भेट आवर्जून 'मोहाची'
अचानक तोल गेला आज सांभाळून जाताना

नव्या लाटा नवी खळबळ नवे वादळ पुन्हा आले
कशाला पाहिले त्याने असे परतून जाताना

तुझ्यामाझ्या भल्यासाठी नियम पाळायचे काही
नवेही सांधले जावे जुने उसवून जाताना

कुणाला आठवण यावी  निघुन  येथून गेल्यावर
अपेक्षा एवढी आहे ठसा ठेवून जाताना

...................................
सौ दिपाली कुलकर्णी

No comments:

Post a Comment