तीन गझला : डॉ. विद्या देशपांडे



१.

दुःख दारुण किती भोगतो उंबरा
देत आधार तो  सोसतो उंबरा

जानकीने कशी रेष ती लांघली
मूक अश्रू किती ढाळतो उंबरा

चूक झालीच नाही अशी कोणती
दूषणे देत का कोसतो उंबरा

दूर देशातला पुत्र आला घरी 
तोषते माय ती  हासतो उंबरा 

सौख्य पाहून दारातले कोवळे
देव आहे असे जाणतो उंबरा

२.

सवय लागली मज अशी पिंजऱ्यांची
गुलामीत गोडी शपथ उंबऱ्यांची

विसरले कशी अस्मिता स्पंदनांची
नसे खंत आता मनाच्या चऱ्यांची

लबाडीत दुनिया गुरफटून गेली
कुणी ना  विचारी कहाणी खऱ्यांची

व्यथा घेत नाही समजुनी कुणीही
दिसे रांग ही कातळी चेहऱ्यांची

नसे प्रेम माया कुणाची कुणाला
कशी आटली ओल निर्मळ झऱ्यांची

३.

सृष्टी सजते मेघ बरसता चित्त कोरडे ठक्क
जगण्याचा मी नाद सोडते आणि सोडते हक्क

किती स्मरावे तरी उरावे दुःख काजळी हृदयी
रात्र चालली भाले घुसवत डोळे उघडे टक्क

का प्रेमाचा खेळच झाला विदीर्ण झाले तनमन
वागण्यातली  खोट पाहुनी नशीब झाले थक्क

दुःखाचा हा डंख  केवढा विषही भिनले गात्री
शह देण्याचा नियतीने हा डाव मांडला झक्क

वादळातही आशेचा तो कोंब अंतरी उगवे
अज्ञात अवचित सूर गुंजती हृदयी हलते लक्क

7 comments:

  1. फारच सुरेख

    ReplyDelete
  2. Awesome👏👏👍

    ReplyDelete
  3. खूप छान

    ReplyDelete
  4. तुमच्या रचना खूप छान आहेत. नवनवीन वाचायला मिळते.

    ReplyDelete
    Replies
    1. संदीप मराठेOctober 13, 2022 at 9:57 PM

      तुमच्या रचना खूप छान आहेत. नवनवीन वाचायला मिळते

      Delete