मुस्लीम मराठी गझलकारांचे मौलिक योगदान :बदीउज्जमा बिराजदार


  गझलसम्राट सुरेश भट यांनी गझलेला लोकप्रियता अन् प्रतिष्ठा मिळवून दिल्यानंतर महाराष्ट्रात गझल हा काव्यप्रकार मोठ्या प्रमाणात लिहिला जावू लागला. आज गझल केवळ महानगरीपुरती मर्यादित राहिलेली नाही. खेड्या-पाड्यातून, वाड्या-वस्त्यातून गझलेचं पीक जोमदारपणे बहरत आहे. गझलेचं क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत चाललंय्. काटेकोर आकृतिबंधामुळं, तंत्रामुळं गझलेवर कृत्रिमतेचा आरोप करून प्रचंड टीका करण्यात येत होती. परंतु गझलतंत्राचा बारकाव्यानिशी परिपूर्ण अभ्यास करून मनस्वी आवडीनं सराव केल्यास तंत्रशुद्ध निर्दोष गझल लिहिणं फारसं जिकिरीचं नाही. हे अनेक गझलकारांनी सिद्ध करून दाखवलंय यात मुस्लीम मराठी गझलकारांचा मोठा वाटा आहे. विषयाच्या, आशयाच्या अनुषंगानं सकस गझला लिहून मुस्लीम मराठी गझलकारांनी  गझलेचं दालन समृद्ध केलंय्. त्यांनी गझलेच्या प्रांतात दिलेलं योगदान महत्त्वपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण असं आहे. हे मान्यच करावं लागेल.

     मुस्लीम मराठी गझलकारांची अनेक वैशिष्ट्ये अन् वेगळेपणा इथं नमूद करता येण्यासारखा आहे. मुस्लीम मराठी गझलकारांची गझलेच्या तंत्रावर असलेली हुकमी पकड अन् मराठी भाषेवर असलेलं प्रभुत्व खचितच लक्ष वेधून घेणारं आहे. मराठी मातीचा अस्सल सुगंध असणाऱ्या गझला त्यांनी लिहिल्यात. मुस्लीम मराठी गझलकार देशावर, देशातील संस्कृतीवर, मराठी भाषेवर, मातीवर जिवापाड प्रेम करणारे आहेत. तसंच ते राष्ट्रीय एकात्मतेचा, जातीय सलोख्याचा जयघोष करणारे आहेत. हिंदू धर्मियांच्या अनेक सणावारांवर, उत्सवांवर जसं की दसरा, दिवाळी, होळी, मकर संक्रांत, श्रावण, पंचमी आदींवर मोठ्या आत्मीयतेनं गझला लिहिलेल्या आढळून येतात. यावरून त्यांची सर्वधर्मसमभावाची असलेली बांधिलकी स्पष्ट होतेय.

     क्वचित अपवाद वगळता बहुसंख्य मुस्लीम मराठी गझलकारांनी गझलेच्या शेवटच्या ओळीत मक्त्याच्या शेरात तख्खलूस म्हणजे उपनामाचा सहजतेनं चपखलपणे वापर केलंय. प्रेमाच्या अनुभूती बरोबरच मुस्लीम समाजातील विविध चालीरीतींवर, प्रश्नांवर, समस्यांवरही त्यांनी निर्भीडपणे भेदक अन् वेधक गझला लिहिल्यात. मराठी गझलेला आजवर पूर्णतः अपरिचित असलेलं आपलं प्रामाणिक अनुभवविश्व मुस्लीम मराठी गझलकारांनी त्यांच्या गझलांमधून उलगंडलं. त्यामुळं मराठी गझलेला वेगळ्या विषयांची संपन्नता लाभलीय्. यावरून मुस्लीम मराठी गझलकारांचा मांडणीतील, अभिव्यक्तीतील वेगळेपणा प्रकर्षानं दिसून येतो.

     आजमितीस बहुसंख्य मुस्लीम मराठी गझलकार कसदार गझल लेखन करीत आहेत. परंतु ज्यांच्या नावावर गझलसंग्रह आहेत ज्यांची गझलसेवा दीर्घ अन् उल्लेखनीय आहे. अशा ज्येष्ठ गझलकारांचे निवडक शेर या ठिकाणी रसास्वादासाठी घेण्यात आले आहेत. त्यांची क्रमवारीही ज्येष्ठतेनुसारच लावण्यात आलीय.

■ खावर ■


मरहूम बदीऊज्जमा खावर हे कोकणातील प्रसिद्ध ज्येष्ठ गझलकार होते. उर्दू अन् मराठीत त्यांनी विपुल गझल लेखन केलंय्. नऊ उर्दू कवितासंग्रहांसह मराठीत 'गझलात रंग माझा ' 'माझिया गझला मराठी ' 'चार माझी अक्षरे 'समग्र खावर ' हे चार गझलसंग्रह त्यांच्या नावावर आहेत. गझलसम्राट सुरेश भट यांचे ते समकालीन गझलकार होते. सहजतेनं, उत्कटतेनं सामान्य लोकांची भाषा बोलणारी नि:संदिग्ध गझल कशी लिहावी, याचा वस्तुपाठच त्यांनी नव्यानं गझल लिहिणाऱ्यांसमोर ठेवलाय्. साध्या सोप्या शब्दात सुस्पष्ट गझला लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता. पुणे येथील मेनका मासिकात सुरेश भट यांनी पाच वर्षे 'गझलिस्थान' हे गझलेचं सदर चालवलं. त्यात खावर यांच्या अनेकानेक गझला प्रसिद्ध झाल्या. सिद्धहस्त गझलकार म्हणून ते महाराष्ट्रात नावारूपास आले. या सदराच्या समारोप प्रसंगी भटांनी लिहिलेल्या लेखात असं नमूद केलंय् की, 'खावर यांच्या गझला माझ्यासाठी मानसिक खुराक आहे' केवढी ही अपूर्वाईची गोष्ट आहे. यावरूनच खावर यांच्या गझलांची गुणवत्ता लक्षात येते.

     जीवनाच्या यात्रेत सुखदुःखाचे रंग असणारच. जीवन कधीच एकसारखं नसतं. त्यातच चढ-उतार येतच राहणार. त्याला घाबरण्याचं कारण नाही. कोणत्याही परिस्थितीत माणसानं जगण्याला समरसून भिडलं पाहिजे, असंच त्यांचं सांगणं होतं. हा त्यांचा शेर पाहा.

'चालायचेच ऐसे यात्रेत जीवनाच्या
दसरा कुठे तरी अन् कोठेतरी दिवाळी '

■ डॉ. अजीज नदाफ ■


     सोलापूरचे ज्येष्ठ गझल अभ्यासक डॉ. अजीज नदाफ यांनी नागपुरात पार पडलेल्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलंय. 'हिंदी उर्दू आणि मराठी गझल-छंदाचा तुलनात्मक अभ्यास ' या विषयावर त्यांनी पीएचडी केलीय. तसंच 'मराठी गझल छंदांची बाराखडी ' ही पुस्तिका लिहिलीय. सदर पुस्तिका नव्यानं गझल लिहिणाऱ्यांसाठी अन् गझलेच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरतेय. गझलेच्या कार्यशाळेतून नवोदितांना सातत्यानं मार्गदर्शनही ते करताहेत. 'हा छंद गझलांचा ' 'तो सूर्य आज आला ' हे त्यांचे दोन गझलसंग्रह प्रकाशित झालेत. त्यांना पहाडी आवाजाची देणगी लाभलीय. आज वयाच्या पंच्याऐशीनंतरही खड्या आवाजात पोवाड्याच्या धर्तीवर जोशात, झोकात गझल पेश करून ते मैफली जिंकतात. गझलेच्या सादरीकरणाला त्यांनी नवा आयाम दिलाय.हे त्यांचं वेगळेपण आहे. डॉ. नदाफ यांची गझल कल्पनेच्या भराऱ्या नाही घेत. तिला वास्तवतेचा ध्यास आहे. जे समोर स्पष्ट दिसतं. ते प्रकर्षानं जाणवतं त्याच्याच बाता त्यांची गझल करत राहाते. आवेश मोकळा करते. आवेश मोकळा झाला की तणावाला जागा नाही उरत. मक्त्याच्या शेरातून त्यांनी ही बाब कथन केलीय्. मोकळेपणानं गझलेतून व्यक्त होणं ही त्यांची खासियत आहे.

'लिहिले 'अजीज' आता दिसल्या तशाच बाता
आवेश मोकळा हा आता तणाव नाही '

■ महामूद सारंग ■


     मुंबईचे महामूद सारंग प्रसिद्धीपासून सदैव कोसो दूर असलेले ज्येष्ठ गझलकार आहेत. 'आपण बरं अन् आपलं घर बरं' असं स्वतःला बजावत कुठल्याही गटातटात, कंपूशाहीत सामील न होता एकांतात शांतपणे गझल लेखन करणारे महामूद सारंग यांचे 'विखुरलेले शब्द ' 'उजेडाच्या स्वागतासाठी ' हे दोन गझलसंग्रह प्रकाशित आहेत. 'शहरातले हायकू ' हा हायकूसंग्रह त्यांच्या नावावर आहे. अगदी मोजक्याच दिवाळी अंकातून, प्रातिनिधिक गझलसंग्रहातून अंतर्मुख करणाऱ्या त्यांच्या गझला वाचनात येतात. तेव्हा या गझलकाराला समग्र वाचलं पाहिजे. ऐकलं पाहिजे असं राहून राहून वाटत असतं.

     हायकूची तरलता त्यांच्याजवळ असली तरी त्यांच्या गझलांमधून मात्र समाजचिंतन पोटतिडकीनं येतं. दुनियादारीच्या बाजारापासून अलिप्त राहून सामाजिक विषमता, नात्यातील फोलपणा, माणसाचा माणसांकडे बघण्याचा विखारी दृष्टिकोन, राजकारण्याच्या जात्यात सर्वसामान्यांचं भरडत चाललेलं आयुष्य. यावर सारंग गझलेच्या माध्यमातून आपली लेखणी बिनधास्तपणे चालवतात. 'जगण्यामधून माझी दु:खे मला कळाली' असं ते सांगतात. जगणं समजलं की बऱ्याच गोष्टींचा ताळेबंद मांडता येतो.

     आपुल्यापणाची गोष्टच मुळी अतार्किक असते. ती लवकर लक्षात नाही येत. त्यातले पेच गहिरे असतात. माणसाला परक्यांपासून फारसा धोका संभवत नसतो. धोका देतात ती आपलीच माणसं. अनुभवातून आलेली 'आपबीती' महामूद सारंग त्यांच्या शेरातून सांगतात.

'दात आहे आपुले अन ओठसुद्धा आपुले
आणखी 'महामूद' देऊ मी कुणाचे दाखले '

■ कलीम खान ■


     आर्णीचे (यवतमाळ) मरहूम कलीम खान हे प्रतिभावंत, चिंतनशील गझलकार व गझलेचे जाणते अभ्यासक होते. पनवेल येथे झालेल्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनातील मिलाजुला मुशायऱ्याचं अध्यक्षपद त्यांच्या वाट्याला आलं होतं. 'गझल-कौमुदी' हा त्यांचा मराठी गझलेच्या प्रांतात वेगळी वाट चोखाळणारा गझलसंग्रह ठरला. त्याचं वैशिष्ट्य असं की, त्यात गझल व रुबाईबाबतची दोन परिशिष्टे समाविष्ट केलेली आहेत. अभ्यासाच्या दृष्टीनं त्यात अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे. आर्णीसारख्या छोट्या आडवळणी गावात राहून त्यांनी केलेली गझलेची साधना उल्लेखनीय आहे.

     मंजर (साझा हिंदी-उर्दू गझलसंग्रह) संपादित करून त्यांनी हिंदी-उर्दू गझलेच्या अनुबंधाच्या अनुषंगानं मौलिक योगदान दिलय. गझल रसिकांसाठी ही दुहेरी पर्वणीच आहे. शिक्षकी पेशा असणारे कलीम खान यांचे हिंदी, मराठी, उर्दू, इंग्रजी, संस्कृत आदी भाषांवर विशेष प्रभुत्व होते. ते राष्ट्रीय बाण्याचे गझलकार होते. त्यांना भारताविषयी विलक्षण अभिमान होता. इथल्या गंगा-जमनी संस्कृतीवर त्यांचं मनस्वी प्रेम होतं. राष्ट्रीय सलोख्याचं प्रतीक असणारा त्यांचा शेर

'बाबरी मस्जिद असो वा जन्मभूमी पुरुषोत्तमाची
माझियासाठी अयोध्या आदराचे स्थान आहे '

■ इलाही जमादार ■


     दुधगावचे (सांगली) ज्येष्ठ गझलकार मरहूम इलाही जमादार हे गझलेच्या क्षेत्रातील सर्वश्रुत नाव आहे. त्यांनी विपुल प्रमाणात गझल लेखन केलंय्. त्यांचा गझल शुद्धीशास्त्राचा गाढा अभ्यास होता. 'जखमा अशा सुगंधी ' 'भावनांची वादळे ' 'अभिसारिका ' 'गझलशलाका ' 'सखये ' 'गुफ्तगू ' 'मोगरा ' 'चांदणचुरा ', 'रंगपंचमी ' 'निरागस ' 'आभास ' यासारखी दर्जेदार गझलेची ग्रंथसंपदा त्यांनी कमावली. आकाशवाणी व दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कवी होते. गझलेचे अनेक मान-सन्मान अन् पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. त्यांचं खास वैशिष्ट्य असं की दोह्यांचाही त्यांचा सखोल अभ्यास होता. 'दोहे इलाहीचे' हे त्यांचं पुस्तक कौतुकास  पात्र ठरलं.

     इलाही जमादार हे अखेरच्या श्वासापर्यंत उत्तमोत्तम गझला लिहित राहिले. त्याबरोबरीनं गझलेची कार्यशाळा, गझल क्लिनिक अशा उपक्रमांतून ते नवोदितांना भरभरून मार्गदर्शन करत राहिले. दोन ओळींमधला सुसंवाद असो वा विरोधाभास. भावनांची वादळे असो वा हळुवारपणा ते तितक्याच ताकदीनं मांडत राहिले. जमादार यांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की ते प्रयोगशील गझलकार होते. त्यांनी उर्दू-मराठी मिश्रित (कॉकटेल) गझलाही लिहिल्यात. त्यांना रसिकांची अभूतपूर्व दाद मिळाली. शेरातील पहिली ओळ उर्दूत तर दुसरी ओळ मराठीत. आशयाला भाषेचा अडसर येऊ न देता त्यांनी अनोखा प्रयोग केला. मराठीत केला गेलेला हा पहिलाच प्रयोग ठरला. वानगीदाखल त्यांचा शेर पाहा.

'ऐ सनम आँखो को मेरी खूबसूरत साज दे
येउनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे'

■ ऄ.के.शेख ■


     पनवेलचे ज्येष्ठ गझलकार ऄ.के.शेख यांनी रत्नागिरी येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलं. सोलापुरातील अखिल भारतीय गझल संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली. 'जुलूस माझा ' 'मोरपीस ' 'मराठी गझल ' 'गझलवेदना ' (गझलसंग्रह) 'अमृताची पालखी ' (गझल दिवान) 'गझल ऄके गझल ' (गझल मार्गदर्शन पुस्तिका) ही त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. याशिवाय अनेक प्रातिनिधिक गझलसंग्रहही त्यांनी संपादित केलीत. त्यांच्या गझलेचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांनी अनेक गझलसंग्रहांना प्रस्तावनाही लिहिल्यात.

     सतत गझलेचं चिंतन करणं, नवोदितांना मार्गदर्शन करणं, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं, गझलसंबंधीचे उपक्रम राबविणं यात ऄ.के.शेख व्यस्त असतात. गझलेत रमणारे, गझल गाणारे सौम्य व मृदू स्वभावाचे ते गझलकार आहेत. त्यांच्या गझलेत कटुतेचे स्वर उमटताना नाही दिसत. ते कुरूपतेला सुंदर अन् दुःखाला देखणं करतात. त्यांच्या गझलांना गोड गळ्याची साथ लाभल्यानं मैफिलीत त्यांच्या गझला भाव खावून जातात. गझलेतील प्रेमविषयक भावभावना ते उत्कटतेनं मांडतात.

'गालावर बट ती अवखळ, अवखळ, अवखळ
अन् त्यावर हसणे खळखळ, खळखळ, खळखळ '

■ खलील मोमीन ■


      मनमाडचे खलील मोमीन हे संवेदनशील गझलकार आहेत. नाशिक येथे घेण्यात आलेल्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद यांनी भूषविलंय्. अक्षरांवर प्रचंड प्रेम करणाऱ्या या अक्षरनिष्ठ गझलकारांच्या घराचं नाव 'अक्षराई' असंच आहे. निरालय, अन् अक्षराई ही त्यांची दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. 'अक्षराई' या त्यांच्या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वांग्मय निर्मितीचा पुरस्कार लाभलाय्. अहमदनगरचा संजीवनी खोजे पुरस्कारही त्यांनी पटकावलाय्. महाराष्ट्रातील अनेक नामवंत दिवाळी अंकातून त्यांच्या कविता-गझला प्रसिद्ध होत असतात. आत्ममग्ननेतून आत्मशोध घेत राहणं त्या शोधातून जे हाती लागतं ते सार रूपानं गझलेत मांडणं ही खलील मोमीन यांच्या लेखनाची धाटणी आहे. दिखाऊ पेक्षा टिकाऊ लिहिण्याचा त्यांच्या प्रतिभेला लळा आहे. निसर्गाची विविधांगी मोहक चित्रं ते गझलेतून रेखाटतात. त्यांच्या बहुतांशी गझला चरित्रात्मक शैलीचा प्रत्यय देणाऱ्या आहेत. हा मोमीन यांचा गुणविशेष आहे.

'नको दिखाऊ हवी टिकाऊ सदैव नीती
फुलातुन ये सुगंध प्रीती तशी हसावी '

■ फातिमा मुजावर ■


     महिला गझलकारांमध्ये सातत्यपूर्वक गझल लेखन करणाऱ्या गझलकारा म्हणून पनवेलच्या प्रा. फातिमा मुजावर यांचं नाव घेतलं जातं. पनवेल येथे झालेल्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं आहे. रोशन, पान मनाचे हे त्यांचे दोन गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत. उत्कृष्ट प्राध्यापिका म्हणून आदर्श शिक्षिका पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय्. सावित्रीबाई फुले या मुंबई विद्यापीठाच्या पुरस्कारानंही त्यांच्या गझलेचा गौरव झालंय.

     स्त्रीचं माणूस असणं यासह तिची घुसमट, फरपट, कोंडमारा अन् तिचं निमूटपणे सोसणं अशा स्त्री जाणिवांच्या गझला प्रा. मुजावर यांनी लिहिलेल्या आहेत. स्त्रीच्या वाट्याला सुखापेक्षा दुःख, प्रकाशापेक्षा अंधारच अधिक येत असला तरी गझलकाराच्या 'पान मनाचे' त्याला 'रोशन' करून जातं. मुजावर यांची गझल तिष्ठत बसलेल्या स्त्रीच्या वेदनेला संयमानं उद्गार देते. ती त्रागा करत नाही येत. माणुसकीचा धागा धागा जोडत प्रकटते. ही मराठी गझलेतील वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. त्या परिप्रेक्ष्येतूनच त्यांच्या या शेराकडं पाहिलं पाहिजे.

'माणुसकीच्या संस्कारावर एक गझल तिष्ठत होती
चिखलामधल्या त्या कमळावर एक गझल तिष्ठत होती '

■ जहीर शेख ■


     ठाण्याचे मरहूम जहीर शेख हे मुस्लीम मराठी गझलकारांमधील एक महत्त्वाचे गझलकार होते. ते विद्युत अभियंता होते. त्यांचं स्वतःचं वर्कशॉप होतं. अतिशय रुक्ष क्षेत्रात कार्यरत राहूनही त्यांनी मनात गझलेची हिरवळ जपली होती. आम्ही दोघे, उध्वस्तांच्या वस्तीमध्ये हे त्यांचे दोन गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत. जहीर शेख यांनी सुरुवातीला कविता लेखन केलय्. डॉ. मो. इक्बाल यांच्या उर्दू काव्यखंडाचा मराठीत काव्य छायानुवाद वृत्त छंदात त्यांनी केलाय. आंतर महाविद्यालयाच्या काव्य स्पर्धेत त्यांनी प्रथम पारितोषिकही मिळवलय्. नंतर त्यांच्या गझल लेखनाचा प्रवास सुरू झाला. प्रकटीकरणाचं प्रथम माध्यम म्हणून त्यांनी शेवटपर्यंत गझलेचा हात नाही सोडला अन् गझलेनंही त्यांची साथ नाही सोडली. मुशायऱ्यातून ते भारदस्त गझलेचं सादरीकरण करत असत.

     गीत लेखनाला शब्दांची जी सुगमता, प्रासादिकता लागते ती जहीर शेख यांच्या गझलांमधून सहजतेनं प्रकटत होती. प्रेमभावना, सामाजिक जाणिवा व्यक्त करणारा हा गझलकार अलीकडच्या काळात मात्र जगण्या-मरण्यावरच अधिकतेनं गझला लिहू लागला होता. जीवनाची क्षणभंगुरता त्याला स्पष्टपणे जाणवत होती. त्यातून कैकदा नैराश्येचा सूरही उमटत राहायचा. त्याला मृत्यूची छाया वेढून राहिली होती. पैलतिराच्या हाका ऐकू येत होत्या. आपण आता गझलेतूनच जगणार. 'आज परतून जावयाची वेळ आली.' असं स्वतःला सांगूनच त्यानं जगाचा निरोप घेतला.

'जायचे हे 'जहीर' पैलतिरा
मी करावा इथे निवास किती? '

■ डॉ. शेख इक्बाल मिन्ने ■


     औरंगाबादचे डॉ. शेख इक्बाल मिन्ने हे व्यवसायानं डॉक्टर असले तरी साहित्यात भरभरून रस घेणारे रसिक मनाचे गझलकार आहेत. औरंगाबादेतील अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलंय. विश्व गझल परिवार, अखिल भारतीय मुस्लीम मराठी सांस्कृतिक मंडळाचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. काळजात गझलेची जखम ताजी ठेवणारे डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांचे  'जखम काळजाची ' 'अस्वस्थ समाजाच्या मनातलं काही ' असे दोन गझलसंग्रह आहेत. यातून त्यांनी अस्वस्थ मुस्लीम समाजाच्या ठसठशीत वेदना अत्यंत पोटतिडकीनं मांडल्यात. 'उठा गड्यांनो' (बाल गझलसंग्रह) रुबाइयात ही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. उठा गड्यांनो हा त्यांचा मराठी गझलेतील पहिला बाल गझलसंग्रह आहे. तसंच रुबाइयात हे पुस्तक देखील पहिलावहिला प्रयोग आहे. या पहिलेपणाचं यथायोग्य मूल्यमापन होणं, या दोन्ही पुस्तकांची ठळकपणानं दखल घेतली जाणं गरजेचं आहे.

     कामाच्या प्रचंड धबडग्यातही त्यांचं गझल लेखन, संशोधन अखंडपणे सुरूच आहे. विविध साहित्य संमेलनातून ते गझलांचं प्रभावीपणे सादरीकरण करत असतात. महाराष्ट्रातील अनेक नामवंत गायक गायिकांनी त्यांच्या गझलांना स्वर दिलाय्. कैक वांग्मयीन संस्थांचे त्यांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. प्रेमाची, विरहाची, सुखाची, दुःखाची, उन्हाची, सावलीची, फुलांची काट्यांची सर्व भाव-भावनांची रेलचेल 'जखम काळजाची' मध्ये पहावयास मिळते. काळजात जखम असली तरी त्याची ते काळजी न करता सर्वांना हसतमुखानं सामोरं जातात. काळजातून निघणाऱ्या जाळातूनच वेदनेला कोंब फुटतो, अशी कल्पना कुणालाही सहज नाही सुचत. डॉक्टरांच्या 'छोटी बहर' मधील शेर थेट काळजाला भिडतो. ते लिहितात.

'काळजातुन जाळ निघतो
वेदनेला कोंब फुटतो '

■ मुबारक शेख ■


     सोलापूरचे गझलकार मुबारक शेख हे चतु:रस्त्र प्रतिभेचे धनी आहेत. त्यांच्या प्रतिभेला कुठल्याच विषयाचं, विभागाचं वावडं नाही. पद्य असो वा गद्य त्यांची चौफेर मुशाफिरी सुरूच असते. ते पत्रकार असल्यानं समाजजीवनातील प्रत्येक घडामोडींकडं चौकसपणे पाहातात. मुबारक शेख यांचा 'काट्यांचे ऋण' हा गझलसंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून प्रकाशित झालंय्. ज्यास ज्येष्ठ गझल चिकित्सक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांची प्रस्तावना लाभलीय्. तर सुरेश भट, पु. ल. देशपांडे यांचा अभिप्राय प्राप्त झालाय्.

     कथा, कविता, गझल, बाल वांग्मय, ललित वैचारिकलेखन अशा सर्वच विधा ते समर्थपणे हाताळतात. त्यांचा अनुभव दांडगा आहे. लेखनाचा परीघ मोठा आहे. आजपावेतो त्यांचं गझललेखन थांबलेलं नाही. मौज, महाराष्ट्र टाइम्स, दीपावली, अनुष्टुभ, साधना, युगवाणी या दर्जेदार दिवाळी अंकातून त्यांच्या गझला-कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. किमान वीसेक पुस्तकं सहज निघतील इतकं साहित्यलेखन त्यांच्याकडं जमा आहे. महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांग्मय निर्मितीचे पुरस्कारही त्यांना लाभलेत. इयत्ता तिसरी, पाचवी, नववीच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितांचा समावेश झालाय्. 'नमाज आणि महाआरती' या बहुचर्चित कथासंग्रहानं ते प्रसिद्धीच्या झोतात आले. मुस्लीम मराठी साहित्य हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा, अभ्यासाचा विषय आहे.

     दुसऱ्यांचा हक्क हिरावून घेणं, त्यांच्या मूलभूत हक्कांपासून त्यांना वंचित ठेवणं ही दुनियादारीची रीत बनत चाललीय्. लाळघोटे, चामचोट माणसांची नेहमीच चलती असते. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारी ही अप्पलपोटी टोळी जागोजागी दिसून येते. ही माणसं मांजरासारखी वासरांच्या दुधावर, बोक्यासारखी दुसऱ्यांच्या लोण्यावर टपून बसलेली असतात. खरे हकदार हक्कांपासून दूर फेकले जातात. अशा हुजऱ्या बांडगुळांना पोसणारी व्यवस्था कार्यरत असते. इथं मांजरं माणसाचंच प्रतीकात्मक रूप घेऊन येतात. ज्यांना दुसऱ्यांच्या हक्काची जाणीव नसते. अशा लाळघोट्या प्रवृत्तीवर मुबारक शेख यांनी प्रकाशझोत टाकलाय्.

'वासरांना हक्कही नाही दुधाचा
रांग आली लाळघोट्या मांजरांची '


■ सिराज शिकलगार ■


सांगली जिल्ह्यातील आंधळी येथील सिराज शिकलगार हे नियमितपणे गझल लिहिणारे गझलकार आहेत. गझलेच्या विविध आकृतिबंधात वास्तववादी गझला लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे एक दोन नव्हे तर तब्बल बारा गझलसंग्रह प्रकाशित झालेत. परंतु प्रसिद्धीच्या दृष्टीनं त्यांचा फारसा बोलबाला झालेला नाही. गझल समीक्षकांनी देखील त्यांच्या गझल लेखनाकडं लक्ष दिलेले नाही. ही खेदाची बाब आहे. असे असले तरी त्यांना प्रसिद्धीचा सोस नाही. गटातटापासून दूर राहून एकांतात गझलसाधना करत राहणं. हाच त्यांचा जणू नियम आहे. बारा गझलसंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतरही त्यांच्या ठायी बडेजाव अथवा आत्मप्रौढी नाही. तंत्रशुद्ध गझल लिहिण्याचा वकूब त्यांनी स्वकष्टानं, अभ्यासानं प्राप्त केलाय्. सोलापूरचे गझलकार, गझल समीक्षक बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी) यांनी मात्र शिकलगारांच्या गारवा गझलला प्रस्तावना लिहून त्यांच्या गझलांचे यथायोग्य मूल्यमापन केलंय्. त्यांच्या गझलसंग्रहांना अनेक संस्थांचे पुरस्कार लाभलेत. ही त्यातल्यात्यात जमेची बाजू म्हणता येईल.


     राजकारण असो की साहित्य, क्षेत्र कुठलेही असो संगनमताने आपापले गट तयार करण्यात येत आहेत. एकनिष्ठतेला मूठमाती देवून मोट बांधली जाते. दुर्दैवाने अशा बाजारबुगण्याच्या हाती सत्ता येते. मग या सत्तेचा, अधिकाराचा उदो उदो करणाऱ्यांच्या गळ्यातच सन्मानाचे हार पडतात. हा सगळाच बेगडीपणा असतो. स्वाभिमानी अन् अस्सल प्रतिभावंतांना मात्र तांदळातल्या खड्यासारखे बाजूला काढून टाकण्यात येते. या वास्तवाकडं त्यांनी शेरातून लक्ष वेधलंय्.


बेगडी संगनमताने स्थापिली सत्ता तयानी

नष्ट झाली एकनिष्ठा बांधलेली मोट आहे


■ बदीऊज्जमा बिराजदार ■


     सोलापूरचे गझल समीक्षक व गझलकार बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी) हे अन्य काव्यप्रकार हाताळत असले तरी गझल हेच त्यांचा आत्मप्रकटी करण्याचे प्रमुख माध्यम आहे. माझ्या गझला, माझा गुलदस्ता हे त्यांचे दोन गझलसंग्रह प्रकाशीत आहेत. या दोन्ही गझलसंग्रहाना थोर समीक्षक डॉ. राम पंडित व मुबारक शेख यांच्या प्रस्तावना लाभल्या आहेत. साबिरवाणी हे त्यांचे दोह्याचे पुस्तक बहुचर्चित ठरले आहे. अनेक गझल संमेलनात व उर्दू मराठी मिलाजुला मुशायऱ्यात बिराजदार यांचा निमंत्रित गझलकार म्हणून सहभाग असतो. दैनिक दिव्य मराठीत गझलेच्या गावात हे आस्वादक समीक्षेचे त्यांनी वर्षभर सदर चालविले. या अनोख्या सदरास महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद लाभला. दर्जेदार दिवाळी अंकातून त्यांच्या गझला प्रसिद्ध होत असतात. नवोदित गझलकारांच्या गझलसंग्रहांना त्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिल्या आहेत. सातत्यपूर्ण गझल सेवेबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार लाभले आहेत.


     दारिद्र्यात खितपत पडलेली माणसेच त्यांच्या गझलेचा केंद्रबिंदू आहेत. माणसानं माणसाच्या मदतीला गेले पाहिजे. समाजजीवनात माणूस अन् त्याच्या जगण्याचं मोल अधिक आहे. माणसानं माणसावर निर्व्याज प्रेम करावं हा निव्वळ गझलेचा तगादा नसतो तर मानवी जगण्याची ही खरी पद्धत आहे. तिचा कधीही विसर पडू देता कामा नये. सामाजिक बांधिलकीचा केवळ उच्चार करून नाही चालत तर ती कृतीतून दिसायला हवी. या कळकळीनंच त्यांचा शेर येतो.


वाटून टाक साबिर धनधान्य गांजल्यांना

दारिद्र्य माणसाचे आता तरी पळू द्या


     मुस्लीम मराठी गझलकारांनी दिलेलं योगदान अतिशय मौलिक आहे. कारण हे गझलकार नुसते गझला लिहीत बसलेले नाहीत. गझलेचा प्रचारप्रसार व्हावा, गझलेची चळवळ अधिकाधिक गतिमान व्हावी याकरिता मार्गदर्शनपर पुस्तिका लिहून गझल कार्यशाळा, गझल क्लिनिक या सारखे उपक्रमही राबवत आहेत.

.................................
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३
sabirsolapuri@gmail.com

No comments:

Post a Comment