तीन गझला : सुजाता दरेकर



१.

कुणासाठी तिचे असणे जसे खुंटीस बोकड
कुणासाठी हवेसे बंधनाचे तेच जोखड 

मनाचे पंख झाल्यावर कशाला आवरू मी
मला जर गाठता येतो नभाच्या पारचा गड

तुझ्याशी वाद केल्याने मला मिळणार काही?
ऋतूवाचून होणारी नको असतेच पडझड

विसरलो तू जरी म्हणतोस पण खोटेच सारे
मला पाहून जर होते तुझ्या हृदयात धडधड

मनाला ऊब देणारे कुठे औषध मिळेना
तरीही थांबवत नाही मनाची तीच चरफड

नको संताप डोक्याला विनाकारण कशाचा
शहाण्यांच्या जगामध्ये बरे असणेच अल्लड

अशा मी लाख दुःखांचा चढुन जाईन डोंगर 
नको भिववूस आयुष्या कथा सांगून भाकड

२.

जात्यातले बोलून गेले चार दाणे
पेरायला उरलेच नाही जर बियाणे?

गर्दी किती झाली ढगांची आतमध्ये   
गाऊ कसे ओठातले पाऊसगाणे

रक्तामधे नसते कुणाच्या फास घेणे
जगणे नकोसे वाटते मेल्याप्रमाणे

नुसतेच आहे राबणे भाग्यात अमुच्या 
फुरसत कुठे वाटायला कंटाळवाणे

उडत्या नभाला टांगले मी प्रश्न सारे
तारेल की मारेल हे तर तोच जाणे 

३.

स्वप्न जे डोळ्यात आहे
ते कुठे सत्यात आहे

माळला गजरा फुलांचा
अडकला वासात आहे

दोष का नशिबास देऊ 
व्यंग जर माझ्यात आहे

जिंकले काळीज माझे
ओढले जाळ्यात आहे

वीरता मरण्यात नाही
ती तुझ्या जगण्यात आहे

सुख म्हणे कर्मात नाही
खूळ हे डोक्यात आहे

रोज एकाकी उसवते
दुःख जे बहरात आहे

मीच माझी कामधेनू
मान्य जे भाग्यात आहे 

नेहमी बिनधास्त भेटू
प्रेम जर दोघात आहे

2 comments:

  1. छान गझला, अभिनंदन ताई !

    ReplyDelete
  2. मनःपूर्वक आभार

    ReplyDelete