१.
माहिती नाही कुणाला खोड मित्रा
वैगुणांशी सख्य तोवर सोड मित्रा
भरवसा नसतो क्षणांचा कोणत्याही
काळजाला काळजाशी जोड मित्रा
तू नको संदर्भ चाळू दानतीचे
येथले उच्चांक सारे मोड मित्रा
कोण डावे कोण उजवे खेळ दैवी
आपले मानून घ्यावे गोड मित्रा
मजबुरीचा फायदा घेऊन लुटती
त्या गुन्ह्याला तूच वाचा फोड मित्रा
२.
घोर दुष्काळी ऋतूंनी नाडलेल्या माणसांना
काय सांगू दुःख माझे या भुकेल्या माणसांना
फास घेणाऱ्या बळीला घोषणांचा नित्य मारा
देत आहे चेक कोरा पाळलेल्या माणसांना
वाहत्या वाऱ्याबरोबर वाळली पाने उडाली
आठवत आहे कशाला दूर गेल्या माणसांना
तेवणारी एक पणती भग्न स्वप्नांच्या उशाला
का दया यावी तिची ना भारलेल्या माणसांना
सोडताना गाव त्यांना थोपवू बघता धिराने
कोणत्या मार्गास नेऊ हारलेल्या माणसांना
.........................
बबन धुमाळ
9284846393
.
No comments:
Post a Comment