१.
तिच्या आसवांनी भिजे पावसाळा.
उशाशी तिच्या का निजे पावसाळा?
उन्हाच्या झळा प्राण घेवो भलेही
नको आठवांचा, डिजे पावसाळा !
तिचे मन कुकर, बघ हसे देत शिट्टी..
म्हणे दोन नयनी, शिजे पावसाळा
'ढगा थांब ना रे.. तुला सूट शिवतो'
म्हणे एक अंकुर, खिजे पावसाळा
दिसेना कुठे हाय पाऊस-वेडी ?
स्वतः गारठे अन् थिजे पावसाळा.
२.
झुरावे स्वर्ग सातीही असे सुंदर असावे घर
श्रमाने दर्वळावे छान,मातीने मळावे घर
फुटावी लाज थकव्याला,जरा काबाड कष्टांनी..
फुले यावीत घामाला , श्रमाने मोहरावे घर
निघालो दूरदेशी तर , प्रतीक्षेचे झुलो तोरण.
रडावे उंबऱ्याने अन् , प्रवासाला डसावे घर
चुलीच्या फुंकणीचीही , कधीतर बासरी व्हावी?
फुटावा कंठ भिंतींना, स्वरांनी गुणगुणावे घर
विजांनो , वाजवा डी.जे...धरेवरती पडो गारा
अशा वेळी मुलांसाठी जरा अपुले गळावे घर
शिजो पोटात कुक्करच्या भले छद्मी महाभारत.
कणा कणखर असो राया, रडूनीही हसावे घर!
नका काढू विमा नुस्ता कुणीही रक्त -नात्यांचा.
स्वतःचे श्वास जपतो ना, तुम्ही तैसे जपावे घर!
३.
तिला आरशाची नजर लागली तर?
प्रतीबिंब माझेच सांडेल घरभर !
जगू देत नाही,मरू देत नाही...
हळद माखलेली,तिची याद उपवर!
तिच्या ' मीपणावर ' म्हणे आरसाही-
'किती छान दिसतेस ,नुसतीच वरवर !'
विचारेल शंका,कुठाहेत फोटो ?
खुलेआम काळीज फाडेल दिलबर
फिरे गरगरा भोवरा मी युगाचा
मला नित्य घरघर,मुबारक तिला घर !
.................................
रविप्रकाश(चापके)
88 5585 5585
No comments:
Post a Comment