१.
जनता हताश येथे सत्ता मजेत आहे
भलतीकडेच नेता देशास नेत आहे
चिंतेत कास्तकारी कवटाळणार फांदी,
दररोज दोर माझ्या स्वप्नात येत आहे
अन्याय साहतो पण अभिव्यक्त होत नाही
समजू कसा तुझा मी मेंदू सचेत आहे
रानातली अबाधित ठेवा अशीच शांती
निद्रेत शेर माझा सद्या गुहेत आहे
लाचारपण कुणाला येऊ नये असेही
बदल्यात भाकरीच्या गाहान शेत आहे
धरणी रुसेल त्यावर गळणार गर्व त्याचा,
पडणार पृष्ठभागी जोही हवेत आहे
माझ्याजवळ कधीही येणार दुःख नाही
मी मायच्या-पित्याच्या जोवर कवेत आहे
२.
दोन वेळची चूल पेटली, विषय संपला !
अन् पोटाची आग विझवली, विषय संपला!
कुणाच्या बरे इशाऱ्यावरी नाचतोस तू
माझ्यासाठी माय बोलली, विषय संपला!
सत्य बुडवले त्याची नाही खंत कुणाला
पाण्यावरती गाथा तरली, विषय संपला!
बाप बदलला या बैलाने खुर्चीसाठी,
माय सोडली, गाय आणली विषय संपला!
मनास माझ्या का शंकेची सुई टोचली?
मला पाहुनी तुझी फाटली, विषय संपला!
जबाबदारी काट्यांचीही खूप वाढली
पुन्हा नव्याने कळी उमलली, विषय संपला!
काळजामधे पेरल्यात मी व्यथा खोलवर
तेव्हा कोठे गझल उगवली, विषय संपला!
३.
तुझे संकट सदाही, मीच आलो घेत छातीवर
तरी केलास, पहिला वार मित्रा तूच पाठीवर
पुरोगामीपणाचे आठवे आश्चर्य आहे हे
मला नाही पटत म्हणतो, तरी येतोस जातीवर!
उद्या हातून लेकाच्या तुझे मोडेल कंबरडे
उगारत हात असतो जर तुझ्या तू जन्मदात्रीवर
पदाच्या लालसेपोटी बदलता नाव बापाचे
अरे,मी थुंकतो तुमच्या निरर्थक जिंदगानीवर!
गुरूला केवढा आदर तिथे मी द्यायचा सांगा,
फळा सोडून जो बघतो मुलींच्या रोज छातीवर
दिवस भरतील खोट्याचे विजय होईल सत्त्याचा
मला भक्कम असा विश्वास आहे लोकशाहीवर
मस्त
ReplyDelete