१.
उन्हाची वाट खडतर अन् मला चालायचे आहे
तसे ठरवून घे सोबत तुला जर यायचे आहे
पुढे जा तू मला पाडुन तुलाही शक्य झाले तर
इथे पडलेत जे त्यांना, मला उठवायचे आहे
दरी ही खोलशी आहे जसे की दार मृत्यूचे
तरीही वाटते डोळ्यात या उतरायचे आहे
जसे की गूढ एखादी नवी कादंबरी आहे
तिच्या डोळ्यातले पुस्तक मला वाचायचे आहे
सरळ नसतात हे रस्ते वळण पण लागते घ्यावे
जशा जातील या वाटा तसे चालायचे आहे
मला येईल नेता सोबतीने सोडल्यावर जग
असे काहीतरी शेवट तुला मागायचे आहे
२.
अगोदर सत्यवादी शोधले अन् पाळले गेले
खरे जे बोलले त्यांनाच नंतर मारले गेले
तशी तर आमिषे होती इथे आभाळ देण्याची
मनातिल काजवे देखील सगळे चोरले गेले
स्वतःला देव समजुन भक्त केले सर्व दुनियेला
दिवा बनवून जनतेचा निरंतर जाळले गेले
फुग्यांची आमिषे रंगीत येथे दावली आधी
जसे सत्तेत आले ,त्या फुग्यांना फोडले गेले
कथानक तू उन्हाने पोळल्याचे वेदनादायक
बघू दे पाय जे जे सावल्यांनी पोळले गेले
म्हणाले बोलकी आहे तुझी ही लेखणी राजा
मला मौनामधे राहायचे सांगीतले गेले
स्वतः उध्वस्त झाला तो कुणाचा घात तो नव्हता
तरी मारेकरी त्याचे खुळ्यागत शोधले गेले
मनाला तोडणे नाही कुणाच्या चांगले येथे
मनाला राखण्यासाठी मनाला तोडले गेले
कुपीच्या अत्तरागत राज येथे घमघमू शकतो
म्हणुन तर मैफिलीबाहेर त्याला ठेवले गेले
३.
तोड हा पुतळा मला हृदयात राहू दे
फक्त या चौकात का? विश्वात राहू दे !
भेटल्यावरती मला व्हावे प्रफुल्लित जग
त्या ढगामधल्या अशा थेंबात राहू दे
पायथ्याशी येउनी लोळेल श्रीमंती
एवढी श्रध्दा तुझ्या कामात राहू दे
जिंकण्यासाठीच केवळ जन्मला आहे
एवढा विश्वास तू जगण्यात राहू दे
कोपला मंगळ शनी माझ्यावरी बहुधा
चंद्र सुद्धा कुंडलीच्या आत राहू दे
शोधतो का ईश्वराला तू जगामध्ये
तो तुझ्या हृदयात हे ध्यानात राहू दे
केवढे आयुष्य अन जगला कितीसा तू
ना पुन्हा मिळणार जीवन ज्ञात राहू दे
ईश नाही त्या तिथे काहीच नसते ना
मंदिरामध्ये नको,जगण्यात राहू दे
मी कुण्या धर्मामधे पंथामधे नाही
वाटण्यापेक्षा मला अज्ञात राहू दे
शोधता आलेच तर शोधून तू ही बघ
'राजपण' गझलेतले शेरात राहू दे
................................
डॉ.राज रणधीर
९९२२६१४४७१
जालना
अप्रतिम गझला डॉक्टर
ReplyDeleteजी मन:पूर्वक आभार
Deleteआ . सर , सर्वच गझल फार सुंदर 🌷🙏
ReplyDeleteसर्व गझला अप्रतिम...सर...!
ReplyDeleteसर्व गझला अप्रतिम सर...
ReplyDeleteव्वा वाह
ReplyDeleteसुंदर गझला. चिंतनिय. ☘️🌺☘️
ReplyDelete