तीन गझला : अशोक बुरबुरे

१.

कार्यशैली हीच त्याची , भावली म्हणतात लोकां
घालतो जेवायला तो , पेटत्या सरणात लोकां

शेवटी आलेत 'अच्छे' ..  दीस जे येणार होते
इष्टमित्रांना खिरापत अन् मिळे खैरात लोकां

नवनव्या वेषात येतो,तो सनातन पाकशास्त्री
व्यंजने पाकीशिळी दे , घोळुनी पाकात लोकां

लोकशाहीमूल्य कळते  आपल्या त्या सेवकाला
रोज तो विक्रीस बसतो मांडुनी हाटात लोकां

फार्मुला 'अंस्सी-विसाचा' , घावला त्याला,अता तो
मोजतो अंकात लोकां, ठेवतो अंकात लोकां

एकमेकां भेटले की वाटुनी घेतील दु:खे
तोडुनी चौकी,पहारे  मिसळुद्या लोकात लोकां

भारताचे लोक आम्ही वाचवू या संविधाना
अन्यथा पिळतील पुन्हा,ते जुन्या चरकात लोकां

वर्णवाद्यांशी लढाई कालही नव्हतीच सोपी
समजुनी सांगे 'अशोका' , सत्य हे दिनरात लोकां

२.

पोटात पेग तिसरा गेल्यावरी जरासा
चढतो विषय लढ्याचा प्याल्यावरी जरासा

आल्या निवडणुका की जादा खुमार चढतो
नेत्यांवरी जरासा,चेल्यांवरी जरासा

झाला लढा चहाच्या भगुन्यामधील वादळ
उसळे बळेच उकळी आल्यावरी जरासा

तो चळवळीस आता माव्यापरी चघळतो
टपरीवरी जरासा,ठेल्यावरी जरासा

घेतोय चार खांदे, हा नाइलाज माझा
झालो अशक्त थोडा, मेल्यावरी जरासा

३.

('बिल्किस बानो' आणि 'इंद्रकुमार देवाराम मेघवाल' निमित्ताने)

मी पाहतो कि भारत कैसा असेल भावी
असतील वर्णजाती  घटनेहुनी प्रभावी

ते उच्च जातवाले ,संस्कार उच्च त्यांचे
'रेपिस्ट'ही तयांचे ठरतील सुस्वभावी

नावात 'इंद्र' असला वा 'मेघ' आडनावी
पाणी मिळेल प्याया  जातीनुसार गावी

हे रामराज्य आहे ठसवायला हवे जर
निष्पाप शंबुकाची हत्या तडीस जावी

तो अंगठा तुझा तू सांभाळ एकलव्या
असणार शिक्षणाची द्रोणाकडेच चावी

आम्ही असो कितीही उजवे कलागुणाने
ठरणार जात अमुची त्यांच्यापरीस डावी

मागास जन्म घेती,धर्मात ज्या अताही
अडगळ अशी खरेतर , मोडीमधे निघावी

 .................................
अशोक बुरबुरे  'अशोक' , 
हिंगणघाट
9970546236

3 comments:

  1. बुरबुरे तिसरी गझल अप्रतिम ताकदीची....
    भावा गजब लिहिलं.
    तो आंगठा तुझा तू सांभाळ एकलव्या
    असणार शिक्षणाची द्रोणाकडेच चाबी

    ReplyDelete
  2. Congratulations Sir

    ReplyDelete
  3. अप्रतीम तिन्ही गझला आहेत. आता आपणाला आंगठा वाचवून विचार करून सामना करण्यासाठी संघटीत होण्याची गरज आहे.

    ReplyDelete