तीन गझला : रामदास घुंगटकर



१.

जुन्या स्मृतींच्या सुखदुःखाचा पाठ पुरावा 
ताळमेळ मग आयुष्याचा कसा जुळावा?

जगणे आणिक मरणे,आहे अंतर थोडे 
श्वासावर विश्वास कशाला कुणी करावा ?

क्षणभंगुर हे जीवन आहे, असे जगावे
जसा ढगावर इंद्रधनुष्यी रंग चढावा 

रंक आजचा,तोच कालचा राजा होता 
नशीबातला डाव कुणाला,कसा कळावा ? 

क्षणाक्षणाला स्थान बदलते फसवी छाया 
विश्रांतीला शांत आसरा, कुठे मिळावा?

हृदयामधला अजून वाहे पाझर ओला 
जखमांवर त्या फुले सुगंधी,मळा फुलावा !

२.

गळत्या फुलात थोडा मकरंद शोधतो मी
जगण्यात हरवलेला आनंद शोधतो मी

बंदिस्त भावनांचे सुटलेत बंध सारे 
बेधुंद या मनाला तटबंद शोधतो मी

गेला वसंत आता मारून फेरफटका 
बागेत उगवणारा जास्वंद शोधतो मी

रुचला कुणास नाही अंदाज बोलण्याचा 
अधरात घोळलेला गुलकंद शोधतो मी 

घेतो कधी न मदिरा,झालो कसा शराबी ?
गझलेत झिंगणारा, तो छंद शोधतो मी !

३.

पोरका माणूस येथे, कोणता अधिकार नाही 
स्वैर सत्ता,त्रस्त जनता, राहिला आचार नाही 

भाषणावर राहिला ना फारसा विश्वास आता 
रोजची घनगर्जना ही श्रावणाची धार नाही

मावळ्यांची वीर गाथा,साक्ष हा इतिहास आहे 
अंतकाळी देह पडता  थांबली तलवार नाही!

शुभ्र वस्त्राआड सारे कूट कारस्थान काळे 
पारदर्शी कापडाने पाप ते लपणार नाही!

वाकडी वळणे तरीही धावणे बिनधास्त आहे 
वादळाशी झुंजताना घेतली माघार नाही!

ग्रासला काळोख तेव्हा,सावली सोडून गेली
एकटा तू रामदासा, राहिला आधार नाही 

.................................
रामदास घुंगटकर, पुसद 
९६२३७६५३०२

No comments:

Post a Comment