१.
धमनीत वाहणाऱ्या रक्तातही शिवाजी
देहात चालणाऱ्या श्वासातही शिवाजी
हरलेत शाह सारे शिवबास हरवताना ,
लढलेत मावळे जे त्यांच्यातही शिवाजी
जुल्मास मोगलांच्या कापून काढले अन्
इभ्रतीस राखणाऱ्या हातातही शिवाजी
केलेत मोठमोठया गनिमास ठार ज्याने ,
आहेत त्याच गनिमी काव्यातही शिवाजी
जातीत भेद नाही केला कधीच ज्यांनी
रयतेस जाणत्या त्या राजातही शिवाजी
झुकल्यात ताठ माना,गोरे इथेच नमले ,
झालेत खास राजे , विश्वातही शिवाजी
डोंगरदरीत,सागर-किल्ला,
गडात-गगनी,
आहेच तळपणाऱ्या सूर्यातही शिवाजी
२.
बस एकदाच मजला भेटून जा जरा तू
चुकले कुठे कुणाचे,सांगून जा जरा तू
भंगून आज गेले देऊळ काळजाचे
तेथे तुझीच मूर्ती स्थापून जा जरा तू
आहेत ठेवलेली वचने तुझी दिलेली
येऊन परत सारी घेऊन जा जरा तू
जी पाहिलीत स्वप्ने जागून पापण्यांनी
ती आसवात न्हाली,पाहून जा जरा तू
वाटेतले ठसे बघ त्या चोरपावलांचे
आहेत उमटलेले,मिटवून जा जरा तू
श्वासातले उसासे छातीत कोरलेले
स्पर्शून शिल्प त्यांचे घडवून जा जरा तू
३.
संताला जर संत समजलो , चुकले का हो ?
चोराला मी चोर बोललो , चुकले का हो ?
असत्य झाले बलवान जरी हल्ली येथे ,
सत्यासाठी खास झगडलो , चुकले का हो ?
कोण कुणाचे सुतकी येथे , मृगजळ सारे !
त्याच्या मागे अथक धावलो ,चुकले का हो ?
ज्या दगडाला पाझर फुटला,शेत भिजवले
त्या दगडाला देव समजलो,चुकले का हो ?
स्वाभिमान मी कधी न विकला पोटासाठी
लाचार कधी,कुठे न झुकलो,चुकले का हो ?
आवडले ते गेले सारे सोडून मला
नियतीशी मी खूप भांडलो चुकले का हो ?
छान
ReplyDeleteमस्त दादा👏👏👏
ReplyDeleteवाह अप्रतिम तिन्ही गझल
ReplyDelete