तीन गझला : मनीषा नाईक




१.

आठवणींचा फुलतो चाफा 
रोज नव्याने छळतो चाफा 

मी दरवळते मनापासुनी
तो प्रेमाने म्हणतो चाफा

तुझ्या भोवती माझी रुंजी
तुझ्या अंगणी फुलतो चाफा 

शाळा, रस्ता, नदी किनारा
अजून भटकत असतो चाफा

काया होते अत्तर माझी
एकांती आठवतो चाफा

कसे गुंतणे टाळू सांगा
मागे मागे फिरतो चाफा

तुझे नाव ओठावर येते
गालावरती फुलतो चाफा

कपाट, संदुक, जुनी डायरी
किती ठिकाणी लपतो चाफा

म्हणून आहे जगणे सुंदर
सदा भोवती असतो चाफा

कोणी धाडा निरोप त्याला
फार मला आवडतो चाफा

भेट घडवतो दोन जिवांची
जन्म सुगंधी करतो चाफा

२.

केवढी चर्चा उगाचच गाजला होता चहा
फार नाही फक्त सोबत घेतला होता चहा 

काय सांगू, काय बोलू, भेट घेऊ की नको 
होय नाही संभ्रमातच लांबला होता चहा 

छानसा शेजार होता गोड होती माणसे 
आपल्या गावात सुद्धा चांगला होता चहा 

आपला कॉलेज कट्टा मित्र आणिक मैत्रिणी 
मी किती वेळा पणाला लावला होता चहा 

रात्रभर अभ्यास जेव्हा चालला होता कधी
एक आई आणि दुसरा जागला होता चहा

केवढा आनंद होता केवढी होती मजा 
खायला काहीच नव्हते प्यायला होता चहा 

ती तुझी चिठ्ठी गुलाबी भेटली होती मला 
लोकनिंदेच्या भयाने टाळला होता चहा 

एक कप,भरपूर गप्पा, थांबला तू तासभर  
फार तेव्हा गोड बाई लागला होता चहा

शब्द नव्हते फारसे पहिलीच होती भेट ती   
बोलली होती नजर अन् बोलला होता चहा 

मागणी घालायला आलास जेव्हा तू घरी 
केवढा हासत तुला मी आणला होता चहा 

आजही जाते तिथे मी आजही रेंगाळते 
तू जिथे भेटीत पहिल्या पाजला होता चहा 

३.

प्रत्येकाचा आत्मा असतो निर्मोही
प्रत्येकाच्या मनात आसक्त ययाती

गरजे पुरता संवाद एकमेकांशी
गरजे पुरते नाते जपले दोघांनी

होय असू शकते उत्तर माझे सुद्धा
बोल एकदा मनातले तू माझ्याशी

इतके सगळे प्रश्न आहेत लोकांना
इतकी सगळी नवी कारणे जगण्याची

प्रथम भेटलो,दुरावलो, पुन्हा भेटलो
युगायुगांचा प्रवास केला दोघांनी

पंख नवे,जिद्द नवी,आभाळ मोकळे
सोड पिंजरा धडपड कर जगण्यासाठी

अखंड चालू कारभार या दुनियेचा
अंता नंतर सुरू कहाणी जन्माची

1 comment: