१.
का असे पत्रामधे तू शब्द सारे बांधले
कागदामध्ये जसे जळते निखारे बांधले
आजही ते पत्र वाचुन वाटते याचे नवल
तू कसे ओळींमधे हुकुमी शहारे बांधले
विस्तवावर नाचणारा मोर झालो हासरा
वेदनांचे मी कुणासाठी पिसारे बांधले?
थेंबही नाही पडत बाहेर डोळ्यांच्या कधी
पापण्यांच्या भोवती दगडी किनारे बांधले
मी बरा होतो तसा खोलीत माझ्या एकटा
का कुणी खिडकीत माझ्या दोन तारे बांधले
सोडले गलबत नव्याने खवळत्या दर्यात मी
अन् शिडाला फाटक्या बेभान वारे बांधले
२.
दोर दुःखाचा तसा कमजोरही नाही
मरतही नाहीच मी; पण जगतही नाही
प्रश्न पडतो ही अवस्था कोणती आहे...
दुःख नाही कोणते,आनंदही नाही!
हे कळेना नेमके आहे कसे जळणे?
धूरही नाही कुठे अन् जाळही नाही!
या मनाचे काय सांगा मी करू आता ?
ह्यातही नाही रमत अन् त्यातही नाही!
डोह त्या डोळ्यातला बोलावतो आहे
पण बुडावे एवढा तो खोलही नाही!
चालली आहे पुढे ही रेघ काळाची...
अंतही नाही तिला,प्रारंभही नाही!
३.
दुःख जाळे निरंतर विणत राहते
त्यात अडकून मन तडफडत राहते
पाय छाटूनही फरक नाही पडत
दुष्ट इच्छा तरी सरपटत राहते
जीवघेणी पसरते निरव शांतता
मौन माझे-तिचे तळमळत राहते
रोज कोणी तिथे वाट नाही बघत
एक खिडकी तरी बोलवत राहते
का किनारा नकोसा तिला वाटतो
नाव लाटांसवे भरकटत राहते
व्यर्थ जातो असा शोध का नेहमी?
शेवटी तेच ते सापडत राहते
सुंदर
ReplyDeleteतिन्ही गझला छान, अमोलजी
ReplyDeleteव्वा क्या बात है तिन्ही गझला अफलातून
ReplyDeleteदुसऱ्या नंबर ची गझल
आणि तिसऱ्या गझल मधला मतला ...खूप खूप खूपच आवडले
विस्तवावर नाचणारा मोर झालो हासरा... मस्त
ReplyDelete