दोन गझला : अल्पना देशमुख


१.

करावी लागली वणवण तुझ्यासाठी
मनाने सोसली रणरण तुझ्यासाठी

सरी येतात जेव्हा आठवण येते
बरसतो आजही श्रावण तुझ्यासाठी

मनाची एक फांदी कोवळी आहे
तिने जपलेय हिरवेपण तुझ्यासाठी

उन्हेरी, एकट्या, निःशब्द वाटेवर
उभी आहे विनाकारण तुझ्यासाठी

नवी सुरुवात मी केली प्रवासाची
जुने विसरून गेले व्रण तुझ्यासाठी

तुझा एकेक अश्रू लाखमोलाचा
जरी ही गोष्ट साधारण तुझ्यासाठी

करू दे पावसाने नष्ट केले तर
नवे घरटे विणू आपण तुझ्यासाठी

पहा उघडून डोळे एकदा त्यांना
इथे आलेत सगळेजण तुझ्यासाठी


२.

द्वाड होतो, वेंधळा होतो
मी जसा होतो तुझा होतो

लाभते ज्यांना तुझी सोबत
त्या क्षणांचा सोहळा होतो

मूठ असते बंद लाखाची
बोललो की गवगवा होतो

योग्य ते उत्तर दिले असते
मी तुझ्या जागी हवा होतो

मी अता नक्की कसा आहे? 
सांग ना आधी कसा होतो

स्पष्ट सारे बोलता आले
की मनाचा आरसा होतो

तू मला सल्ला दिला,कारण
मी तुझ्यालेखी नवा होतो

दिवस जातो शांतचित्ताने
सांज येते,गलबला होतो

राहिलो हृदयामधे त्यांच्या
मी व्यथांचा लाडका होतो

स्पर्श तू केलास गझले,की
काळजाचा मोगरा होतो

1 comment:

  1. खणखणीत गझला!
    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete