१.
नसेल कोणी तुझ्याबरोबर, काय फरक पडतो
कोणी नंतर कुणी अगोदर, काय फरक पडतो
तुझ्या रथाचा लगाम त्याच्या हाती आहे ना
उभे ठाकले समोर शंभर, काय फरक पडतो
वस्त्राने नग्नता मनाची कुठे झाकते रे
तुझे भरजरी,माझे लक्तर, काय फरक पडतो
प्रयत्न केला फुले फुलावी तुझ्या सोबतीची
तुझी आठवण देखिल अत्तर, काय फरक पडतो
काळा, गोरा, कुरुप, सावळा तुमच्या लेखी मी
आई म्हणते आहे सुंदर काय फरक पडतो
क्षणाक्षणाला जगण्यावरती सवाल करती ते
दिले वा दिले नाही उत्तर, काय फरक पडतो
२.
पावसा रे वाग की पाऊस असल्यासारखा
काय धिंगाणा तुझा माणूस असल्यासारखा
केवढा कल्लोळ माझ्या अंतरंगी नांदतो
वाटतो एकांतही धुडगूस असल्यासारखा
दाखवत नाही हवासा चेहरा माझा कधी
आरसा आहे कुणाची फूस असल्यासारखा
हिंडलो हातात घेउन हात त्या वाटांवरी
मी तरंगत राहतो कापूस असल्यासारखा
टाकली जेव्हा जराशी जीवनाची कात मी
भेटला तो काळही मुंगूस असल्यासारखा
पायरी पाहून होती लावली बोली जरी
भाव त्याला लागला हापूस असल्यासारखा
३.
स्वप्न जुने आठवते हल्ली अडगळ म्हटल्यावर
अन् उदाहरण आयुष्याचे भेसळ म्हटल्यावर
कुठल्या कुठल्या दु:खाला मी सामोरा जाऊ
डावे उजवे होणारच की वर्दळ म्हटल्यावर
कमी न होते वाळवंट हे इंचाने सुद्धा
पण आशेला फुटतो अंकुर हिरवळ म्हटल्यावर
खंत हीच की काही नाही घडत पुढे याच्या
मुठी फक्त वळतात जराशा चळवळ म्हटल्यावर
रस्ता इथला रुंद पुरेसा झाला आहे की
उगाच काही सलते आहे पिंपळ म्हटल्यावर
सैरभैर होणार सुकाणू, क्षुब्ध डोलकाठी
शीड मनाचे उभारायचे वादळ म्हटल्यावर
स्पर्श आइचा, तान्हे हासू, चेहरा तुझा अन्
काय काय आठवू आणखी निर्मळ म्हटल्यावर
Mast
ReplyDeleteNice
ReplyDeleteझकास
ReplyDeleteझकास
ReplyDeleteवाह सुंदर
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteखुपच छान आहेत...
ReplyDelete