१.
सुखासोबत धरेवर दुःख सुद्धा नांदते आहे
जगाची आसवे सारी नदी सांभाळते आहे
कुणाचा जीव घेण्याचा कुणी निश्चय जरी केला
नशीबाच्या पुढे सांगा कुणाचे चालते आहे?
समुद्राची असावी लाट इच्छेसारखी बहुधा
कुणाला मारते आहे, कुणाला तारते आहे
मला हे प्रेम म्हणजे वाटते शेवाळली फरशी
जिच्यावरती स्वतः आयुष्य घसरू पाहते आहे
मला तू आणले आहेस कुठल्या वाळवंटावर?
गिधाडासारखे मन आत घिरट्या घालते आहे
२.
तुलाच नाही नुसते काळे केले
अमुचे सुद्धा दुःख निराळे केले
बंद घराची शोभा वाढत गेली
रंगित चाव्या रंगित टाळे केले
उपासमारी होतच होती आधी
त्यात जिभेने अजून चाळे केले
हळूहळू आपणही विकसित झालो
ताठ कण्याचे पुन्हा लव्हाळे केले
आत्मा स्वतंत्र होऊ शकला नाही
देहाने श्वासांचे जाळे केले
३.
कसे तुझे होणार 'बरे ' नंतर?
दुःखाला आयुष्य बनवल्यावर
लाटांना दे धन्यवाद नक्की
पोचलास जर कधी किनाऱ्यावर
रस्ता अजुनी बनायचा आहे
झेप घ्यायची सवय स्वतःला कर
कृष्ण विवर आहे का ही दुनिया?
सापडत मला नाही माझे घर
चंदन आहे मी लोकांसाठी
अन् वारा आहे माझा ईश्वर
तिन्ही गझला छान, विशालजी
ReplyDeleteवाह... खूप छान
ReplyDelete