१.
पेटवायची आग थोडिशी असे शेवटी ठरले
पेटवल्यावर त्यांच्यासह मग बरेच काही जळले!
जशी अचानक कुठून पडली सत्याची ती ठिणगी
जंगल नंतर सर्व भ्रमांचे जळत त्यामधे बसले
उत्तर देण्यासाठी म्हणून तोंड उघडले जेव्हा
सैन्यच खुनशी प्रश्नांचे तुटुनी त्याच्यावर पडले!
काय आणखी दिले तुम्हाला म्हणजे पटेल खात्री?
रक्तातिल चैतन्य तेवढे आहे शिल्लक उरले!
उगवलो इथे आणि मिसळेन इथल्या मातीमध्ये
कुठे विचारत आहे पण मातीला मी काय दिले?
२.
एक नवे घरटे आधी शोधू आपण
त्यानंतर अपुला पक्षी शोधू आपण
गंभीर किती वक्ता जे सांगत होता
तरी कशी टाळी पडली शोधू आपण
कोंडलोत चारी बाजूंनी या जागी
असतिल त्या अदृश्य फटी शोधू आपण
प्रेमहि करते, खच्चुन भांडण माझ्याशी
कोण नेमकी तुझ्यातली शोधू आपण
जिने आणले नकळत या भोवर्यामधे
बुडण्यापूर्वी ती होडी शोधू आपण
दंगल मोठी...राख शेवटी ठरलेली
कोणाची पहिली काडी शोधू आपण
जळून गेली सगळी स्वप्ने अन् इच्छा
कुणी तिची फुंकली विडी शोधू आपण
३.
कोण जाणे काय म्हटले त्या क्षणाला;
नेमके मग काय घडले त्या क्षणाला
जर मला पटवून कोणी सांगते तर
घट्ट मी असते पकडले त्या क्षणाला
हे नसे काही नव्याने बाधलेले
हे असावे खूळ जडले त्या क्षणाला
एकदा भेटायचा होता दिलासा
रद्द झाले अन् बिघडले त्या क्षणाला
तोल सोडुन बोलला पुष्कळ तिला तो
आणि नाते हाय तुटले त्या क्षणाला
जो खुला पर्याय दिसतो तो स्विकारा
फक्त इतके मी सुचवले त्या क्षणाला
गैर नक्की फायदा घेणार दिसले
मत जुने मग मी बदलले त्या क्षणाला
वाटले जेव्हा धरावा घट्ट आता
दोन हातांनी जखडले त्या क्षणाला
अप्रतिम. जीवनाच्या परिपक्वतेकडे झुकलेल्या. सुंदर छान
ReplyDeleteखूप छान जमल्या आहेत गझला विजय, असेच तुला उत्तम काव्य सुचत राहो हीच सदिच्छा मोहन nijsure
ReplyDeleteसुंदर ! तीनही गझल जाणत्या मनाची होणारी घुसमट समर्थपणे मांडतात.त्या सहज सोप्या आहेतच आणि वाचकाच्या अंत:करणाला थेट भिडतात.अशा अनेक गझकांची रसिक नक्कीच वाट पाहतील . ....विजय मोघे ,मुंबई
ReplyDeleteविजय, तुझा गझलकार म्हणून असणारा वावर खूप छान वाटतोय.
ReplyDeleteतिन्ही गझल अप्रतिमच आहेत.असेच उत्तमोत्तम तुला सुचत राहो.
गजल -1. सद्य परिस्थितीचे वास्तवाची आपण आपल्या गजलमधून केलीली मांडणी मनस्वी भावणारी आहे....
ReplyDeleteगजल -2.कारणभाव शोधण्याकरिता विचार करण्यास लावणारी गजल.
गजल -3. एकूणच जीवन कसे क्षण भंगूर असल्याचे आपल्या गजलमधून छान प्रकटण केल्याचे जाणवते.
सारांश- खूपच वास्तववादी, भावार्थ आणि जीवनार्थ सांगणाऱ्या आपल्या तीनही गजला अप्रतिम आणि मनस्वी भावणाऱ्या आहेत, आपले अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
---अरुण कदम
तीन्ही अप्रतिम. वर्तमान परिस्थिती चे वैचारिक प्रतिबिंब. व्वा लगे रहो.कोठावळे
ReplyDeleteतिन्ही गझला सुंदर! एक गझलकार म्हणून तू नावारूपाला येत आहेस.तुला खूप खूप शुभेच्छा! दीप्ती जोशी.
ReplyDeleteवर्तमान कालीन संदर्भ आणि जीवनमूल्ये यांची सुरेख सांगड घालणारी,मांडणी करणारी वेगळ्या वळणाची गझल
ReplyDeleteतिन्ही गझला सुंदर आहेत.एक गझलकार म्हणून तुम्ही नावारूपाला येत अहात. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.
ReplyDeleteश्री. विजयानंद जोशी यांच्या तीन्ही गझला सहजसुंदर आहेत. वैचारिकता हा त्यांच्या गझलांचा पाया आहे. रत्नागिरीतून अलिकडे जे मराठी गझलकार सुंदर गझललेखन करत आहेत त्यांमध्ये विजयानंद जोशी हे नांव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. गझलचे भान आणि ज्ञानही त्यांच्याजवळ भरपूर आहे, हे विशेष. काही वेळा यांची प्रचिती ही ते मला देत असतात. त्यांना खूप खूप शुभेच्छा.
ReplyDeleteतिन्ही गझला अप्रतिम व वास्तववादी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteअतिशय छान. खूप मस्त वाटलं.
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल सर्वांचे मनापासून आभार
ReplyDeleteविजयानंद जोशी.
खूपच छान रचना. मनाचा कोंडमारा दिसून येतो.
ReplyDelete