१.
प्रेम कृष्णासारखे शृंगारले नाही कुणी
शल्य राधेच्या पतीचे जाणले नाही कुणी
दुर्दशा पाहून त्याची लोक हळहळले किती
व्यंग पाहुन भाळलेले भेटले नाही कुणी
एकदा ते वाहिले,आजी तुझ्या गोष्टीमधे
कावळ्याचे घर नव्याने बांधले नाही कुणी
तू मुलीजागी म्हणाले आदबीने कैकजण
मात्र जावळ माउलीगत हुंगले नाही कुणी
वेदना नाही तिथे घरदार त्याचे राहते
वेगळे आगर सुखाचे बांधले नाही कुणी
स्वच्छता त्यांची करावी वाटली नाही कशी?
आंधळ्या डोळ्यांत अंजन घातले नाही कुणी
घालतो आधी शिवी अन् मग मला म्हणतो असे
एक तू सोडून स्नेहल चांगले नाही कुणी
२.
घर जरी राजाप्रमाणे बांधले नाहीस तू
कर्ज डोक्यावर मुलाच्या ठेवले नाहीस तू
पाहिजे होती तुझी जवळीक सख्ख्यासारखी
शल्य सवतीच्या मुलाचे जाणले नाहीस तू
चांदण्या केसात माझ्या माळुया म्हटलास अन्
आजही आभाळ खाली आणले नाहीस तू
बांधले गेले नदीच्या संथ पात्रावर धरण
सागरी पाण्यास कुंपण घातले नाहीस तू
द्वेष शत्रूसारखा केलास रुसल्यावर पुन्हा
प्रेम माझे तेवढे शृंगारले नाहीस तू
मात्र ते दुष्प्राप्य असते बोलले कोणीतरी
फूल नंतर उंबराचे शोधले नाहीस तू
पाठ वरचेवर तुझी का भाजली सूर्यापुढे ?
ऊन स्नेहलसारखे कवटाळले नाहीस तू
वाह वाह... सुरेख !
ReplyDelete- विजयानंद जोशी.
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम गझल
ReplyDeleteअप्रतिम गझल ताई 💐
ReplyDeleteअप्रतिम दोन्ही गझला
ReplyDeleteव्वा, अप्रतिमच. 👌🏻💐
ReplyDelete