१.
कसे घोंगावते आहे पुन्हा वादळ किनाऱ्यावर
किनारा सोडताना जीव नावेचा न थाऱ्यावर
तिला मी स्पर्श केला आणि झाली चूर लाजेने
किती मी लाजरीच्या काय बोलावे शहाऱ्यावर
लुटीला साथ द्यावी कुंपणाने काय शेताच्या?
अता नाही भरवसा कुंपणाच्याही पहाऱ्यावर
घराला छान आवरले जरी आहे तिने त्याच्या
नसे ताबा तिचा त्या काळजाच्या पण पसाऱ्यावर?
घुबड किंवा गिधाडाचा जरी निर्माणकर्ता तो
चितारी रम्य नक्षी तोच मोराच्या पिसाऱ्यावर
किती विश्वास भक्ताचा असे निस्सीम देवावर
सहज चालून जातो भक्त अनवाणी निखाऱ्यावर
स्वतःसाठी कुठे फुलतो झळा सोसून गुलमोहर?
उधळतो पाकळ्या नाजूक वाऱ्याच्या इशाऱ्यावर
२.
प्रेम की व्यवहार मोठा शोधते मी
हेच कोडे सोडवाया जागते मी
खंत नाही कोण नावे ठेवतो ही
जाणिवा गझलेत माझ्या मांडते मी
खोडकर होतोस ढग तू धावणारा
टेकडी होऊन तेव्हा थांबते मी
जाणते प्रत्येक नजरेला तशी मी
त्यामुळे राखून अंतर वागते मी
रोज आयुष्या तुझ्याशी वाद माझा
वेगळे अस्तित्व माझे मागते मी
जीवनाचे तर बदलते रोज पुस्तक
पान हाती लागलेले वाचते मी
वेग घेते जीवनाची आगगाडी
गाठण्याला वेग मागे धावते मी
मांडलेला डाव मोडू देत नाही
पण मनाला रोज थोडे मारते मी
३.
पंढरीची वाट माझ्या पावलांना पाठ आहे
घट्ट कर्तव्या तुझ्याशी बांधलेली गाठ आहे.
फार भिजलिस चंद्रभागे भक्तिभावाने किनारी
पापणीचा मात्र माझ्या सर्द ओला काठ आहे
बाक मणक्याला जरी संसार सांभाळून आला
ठेवली हृदयात मी भक्तीपताका ताठ आहे
खंत नाही पांडुरंगा मी जरी वारीत नाही
पण विटेशी लीन होण्याचा जुना
परिपाठ आहे
संत गोऱ्याचा चिखल होऊन आले पंढरीला
विठ्ठला कुंभार तू , भक्तिमधला मी माठ आहे
शोध गाभाऱ्यात घेते सावळ्याचा रोज का मी
देव माझ्या नांदतो देहात काठोकाठ आहे
छान
ReplyDeleteभरवसा...
ReplyDeleteकाळजाचा पसारा...
भक्तीपताका...
आवडले...