दोन गझला : सरिता उपासे

१.

सांगते आहे खरे जे फारसे रूचणार नाही
बोलणे खोटे मलाही वाटते जमणार नाही

घोषणांचा, भाषणांचा केवढा हा ऊत येथे
ह्या अशा गर्दीत रमणे हे मना पटणार नाही

लोकशाहीचा इथे तर बोलबाला फार आहे
फार झाले ढोंग यांचे कोणही फसणार नाही

खायचे दुसरेच यांचे दाविती तिसरेच आम्हा
भरविले चुकलेच थोडे पण सहज पचणार नाही
                  
हो मला अधिकार आहे पाहिजे ते बोलण्याचा
हा लढा माझाच आहे,मी मुळी खचणार नाही

२.

भावनांचा या इथे हा मांडला बाजार कोणी?
संपलेल्या आज आशा द्या जरा आधार कोणी

भोवताली आज आम्हा लाभलेला द्वेष सारा,
झेलताना वार तेव्हा घेतली माघार कोणी?

सोडताना सोडवेना पाश सारे बांधलेले
जोखडांना वाहताना जाहला लाचार कोणी.

रावणाचा खेळ झाला, राम राजा थोर झाला
जानकीच्या जीवनी मग पेरला अंधार कोणी?

माय सोशी प्रसववेणा, जीवघेण्या यातना त्या
स्त्रीपणा तो जाणण्याला व्हाल का तैय्यार कोणी?
 

No comments:

Post a Comment