१.
उसवता धागा शिलाईचा
आठवावा हात आईचा.
मी तिच्या लेखी असा आहे
शुभ्र पानी डाग शाईचा.
नाव सांगा एक नमुन्याचे
कल कळाला ज्यास बाईचा.
वाचलो..जन्मून पायाळू..
थोर हा उपकार दाईचा
सज्जनांच्या मारला माथी
जन्मभर ठेका भलाईचा.
२.
तिच्या स्पर्शामुळे येते तरतरीशी शहा-याला.
विनाकारण नका देवू कुणी हे श्रेय वा-याला.
तुझा सौंदर्य महिमा की अघोरी मोहिनी समजू ,
किती लोटांगणे पडली तुझ्या एका इशा-याला.
तिच्या डोळ्यामधे जहरी गुलाबी बाण मायावी
बचावाची ,कुठे संधी ,मिळू देते बिचा-याला.
इथूनी निघ अता सूर्या तुझे तू तोंड कर काळे ;
तिला भेटेल जेव्हा मी, नको कोणी पहा-याला.
तिने मज चुंबण्याआधी तिला मी बोललो एकच
कशाला ठेवते वेडे निखा-यावर निखा-याला?
.................................
वीरेंद्र बेडसे, सि.गो.पाटील महाविद्यालयाच्या पाठीमागे
नागाई काँलनी ,
साक्री (धुळे)
9421886092
No comments:
Post a Comment