दोन गझला : गिरीश खोब्रागडे


१.

चेहऱ्यावर चेहरा मुद्दाम लावा आणखी
दाखवा भोळेपणाचा बस दिखावा आणखी

एवढ्यातच खेळ सारा संपला समजू नका
जिंकण्यासाठी जरा वेगात धावा आणखी

शेकडो दावे नव्याने लावल्या नंतर कुणी
लावतो आहे निराळा एक दावा आणखी

थेट चोराचा पुढे येणार म्हणती चेहरा
लागला त्यांच्या असा हाती पुरावा आणखी

काढतो जेव्हा इथे मी नाव जाण्याचे घरी
बोलती आप्तेष्ट तेव्हा थांब भावा आणखी
                                   
२.

कोणती हातात चिट्ठी लागली
पाहुनी जी झोप नाही लागली

काय माहित कोठुनी आली हवा
अन अचानक एक खिडकी लागली

माय बापाच्या अपेक्षा सोडुनी
लेकरे भलत्याच नादी लागली                             

काल होतो मी तुला परक्या परी
का गरज मग आज माझी लागली

घट्ट आहे आपले नाते किती
आठवण येताच उचकी लागली
                           
.................................
गिरीष खोब्रागडे                        ब्राम्हणवाडा (पूर्व )
संपर्क : 8263912741

1 comment: