१.
भक्तीत आज धरला मी पाय विठ्ठलाचा
झाला लगेच तेव्हा वर्षाव अमृताचा
ना गुंफला कधीही सौख्यात मी फुलोरा
आला कुठून आता हा गंध मोगऱ्याचा?
सांगा कसा न व्हावा आनंद ह्या मनाला?
प्रेमात आज झाला जर स्पर्श चांदण्याचा
बहरून काल असता झाले विराण सारे
कळला नसे कुणाला हा खेळ प्राक्तनाचा
संकल्प सोडलेला जिंकायचेच आहे
घेतो ‘पिके’ जरासा आधार सावल्यांचा
२.
वैऱ्यासोबत सख्याप्रमाणे वागत आहे
हरिचरणाशी सौख्य जगाचे मागत आहे
प्रेम, प्रतिष्ठा, पद, पैश्यांची राखच होते
सत्य सारखे स्मशानभूमी सांगत आहे
तुझ्यासोबती पहिल्या वहिल्या पावसामधे
भिजून जावे ओढ मनाला लागत आहे
मनगटात बळ, मनात आहे इच्छाशक्ती
म्हणून अमुचे अनुदानाविण भागत आहे.
कष्ट पाहुनी पळून गेले कैक शहाणे
‘पिके’ आजही आनंदाने रांगत आहे
No comments:
Post a Comment