१.
मी माझा आसरा शोधला आहे
मी डोळ्यांचा झरा शोधला आहे
छातीवरती सांगुन मारत असतो
शत्रू इतका खरा शोधला आहे
फरार झालेल्या स्वप्नांना कळवा
मी त्यांचा चेहरा शोधला आहे
कसा असूदे, तिने शोधला म्हणजे
माझ्यापेक्षा बरा शोधला आहे
त्या हृदयाला निरोप सांगा कोणी
या हृदयाने हिरा शोधला आहे
त्यांची माझ्यावरची नजर म्हणाली
की त्यांनी मोहरा शोधला आहे
खुर्चीसाठी रक्तपात होऊ द्या
मी माझा कोपरा शोधला आहे
मीच खुनाचा दोषी होऊ शकतो
मी घटनेचा सुरा शोधला आहे
हळूहळू बदलेल जगाची व्याख्या
त्यांनी जर पिंजरा शोधला आहे
२.
एक सत्यही आयुष्याचे भविष्य ठरवू शकते
एक शक्यता आयुष्याचा कणाच मोडू शकते
ती गेल्याचे दुःख मनाला, तितके झाले नाही
दुःख हेच की, ती जातांना छद्मी हासू शकते
इतक्यासाठी बाप तिला बाजारी धाडत नाही
समोर रस्ता असून सुद्धा, मुलगी हरवू शकते
अखेरचे क्षण मोजत असलेल्या या हृदयामध्ये,
एक तुझी हळवीशी फुंकर वादळ उठवू शकते
ओठांनी तू 'हो' म्हणताना इतके समजुन घे की,
त्या डोळ्यांची भाषा या डोळ्यांना समजू शकते
बाभळीतल्या मुक्या कळ्यांनो जपून माना काढा
त्या काट्यांची फौज तुम्हाला हळूच लगडू शकते
ज्या कवितेला पापणीतली ओल बिलगली नाही
ती कविता मग फक्त वहीचे कात्रण वाटू शकते
३.
तुटल्या,फुटल्या,मेलेल्या हृदयावर शंका येते
अजूनही छातीच्या धडधडण्यावर शंका येते
मला मारणाऱ्याचा आधी शोध थांबवा तुम्ही
कुणाकुणाला सांगा मग माझ्यावर शंका येते
वणव्यासाठी दोषी ठरली आहे आग तरीही
मला अजूनी 'सुटलेल्या' वाऱ्यावर शंका येते
निष्कर्षाचा पाया जेव्हा पुरता खचतो तेव्हा
समोर दिसणाऱ्या सुद्धा दृष्यावर शंका येते
दृष्ट लागल्यानंतर राणी तुला कुणाची हल्ली
मला तुझ्या त्या लोचटशा ऐन्यावर शंका येते
ओठांवरती जरी मिळाले लाख विषारी नमुने
प्रेत पाहुनी मला तिच्या डोळ्यांवर शंका येते
कशास इतके सांग तुझे मी लाड करू आयुष्या
क्षणोक्षणी जर तुला तुझ्या असण्यावर शंका येते
.........................................
राहुल नंदकिशोर कुलकर्णी, धुळे.
No comments:
Post a Comment