१.
दीड शहाण्या गलक्यामध्ये काय करू मी ?
गाउन गीता गधड्यामध्ये काय करू मी ?
सारे बुटके अवतीभवती विखूरलेले
असून उंची साऱ्यामध्ये काय करू मी ?
छानछोकिचे शहर असे हे झगमगणारे
नंगा फकीर यांच्यामध्ये काय करू मी ?
विज्ञानाची महती पुरती सांगत सुटलो
अज्ञान्यांच्या गलक्यामध्ये काय करू मी ?
सत्य-अहिंसा-बंधुभाव हा ऐवज माझा
हटवाद्यांच्या तोऱ्यामध्ये काय करू मी ?
२.
आयुष्य व्यर्थ गेले सरली तुझी प्रतीक्षा
निम्मे व्यथेत गेले उरली तुझी प्रतीक्षा
जेव्हा तुझ्या स्मृतींचे मोहोळ त्रास देते
मन सैरभैर होते पुरली तुझी प्रतीक्षा
खोट्याच लालसांची का नांदते अपेक्षा
हा प्रश्न अंतरीचा,विरली तुझी प्रतीक्षा
घालून साद मजला भुलवून कोण गेले ?
तो भास मानला मी, हरली तुझी प्रतीक्षा
जन्मा तुझे सदाचे असलेच भूल देणे
फसगत कशी म्हणू मी, झुरली तुझी प्रतीक्षा
.................................
अशोक म. वाडकर मोबा.७०२००११४०८
सरली तुझी प्रतीक्षा ,मस्त
ReplyDelete