दोन गझला: किरण पिंपळशेंडे

१.

तुला काय त्याचे किती त्रास होतो
तरी सारखा का तुझा भास होतो

किती वाट आता बघावी दिवसभर 
तुला भेटल्यावर किती खास होतो

अती होत जातो जिव्हाळाच जेव्हा
कधी तोच नात्यातला फास होतो

जरी होत गेलो अता वेगळाले
तरी एक ताटातला घास होतो

कळेना कसे वेगळे सोबती हे
सखा कोण होतो कुणी दास होतो

कसे गोड मानायचे आठवांना
कधी कोणता मास मधुमास होतो

२.

रेशमाचा तो शहारा सोबतीला
भास की होता सहारा सोबतीला

तू फुलांना माळले केसात माझ्या
त्या सुगंधाचा पहारा सोबतीला

गोडवा नाहीच नात्यांच्यामधे तर
वाढवावा का पसारा सोबतीला

मी कशाला दूर राहू भेटल्यावर
दे मिठीचा तो उबारा सोबतीला

वादळे यावी कितीही उंबऱ्याशी
घे खुशालीचा इशारा सोबतीला

गोड स्वप्ने त्या पहाटेला पडावी
पण असावा तोच तारा सोबतीला

हा उन्हाळा सोसवेना सावलीला
पावसा दे गारवारा सोबतीला

No comments:

Post a Comment