१.
अनुभवली मी ओल कैकदा
इतकी गेले खोल कैकदा
विरून जाते फिरून येते
काळासोबत गोल कैकदा
सोडत त्याचा जुना अबोला
चाफा म्हणतो बोल कैकदा
उरले नाही मागे काही
उरण्याला ना मोल कैकदा
सावरताही आले नाही
तसाच गेला तोल कैकदा
भासवून मग खऱ्यासारखा
खोटा ठरतो रोल कैकदा
अपवादाला कारण पुरते
वादच ठरतो फोल कैकदा
२.
प्रेम तुझ्यावर करता आले असते तर
पुन्हा एकदा जगता आले असते तर
शाळेमधल्या बाकावरती नाव तुझे
माझ्यासोबत बघता आले असते तर
जाळी पडून सुद्धा सुंदर दिसते ना?
तसेच सुंदर दिसता आले असते तर
शेवट त्याचा गोडच व्हावा म्हणून तर
रडता रडता हसता आले असते तर
विझता विझता फडफड होते ज्योतीची
मनाप्रमाणे विझता आले असते तर
जे घडले ते नकोच होते घडायला
चुकलेले निस्तरता आले असते तर
नाव सारखे म्हणून सारा दरवळ... पण,
तुला "चंदना" झिजता आले असते तर
३.
आग, पाणी आणि पारा वाटतो
हा मला नकली निखारा वाटतो
व्यर्थ आहे हा उन्हाळा अन् पुन्हा
पावसाचाही पसारा वाटतो
प्रश्न हाही लांब ठेवू यापुढे
सागराला कोण खारा वाटतो
वादळा देऊ तुलाही शांतता
शेवटी तूही बिचारा वाटतो
भोवताली पाहुनी चांदणचुरा
हा निळाईचा किनारा वाटतो
कोणत्या बागेतली आहे व्यथा
जन्मही गंधाळणारा वाटतो
धन्यवाद 🌹 टीम सीमोल्लंघन....
ReplyDeleteदमदार गझल सर्वच 👍
ReplyDeleteसुंदर रचना
ReplyDeleteखूप सुंदर..तुझ्या 3 ही गझला..शब्दा शब्दांचा अर्थ भावनांना स्पर्शून जातो ..सतत वाचाव असच आवर्जून वाटत ..
ReplyDeleteखूप छान...
विझता विझता फड़ फड होते ज्योतीची...
मना प्रमाणे विझता आल असत तर...
किती छान भावपूर्ण असतात.. तुझी काव्ये...👍👌👌खूपच सुंदर
Khup Sundar
ReplyDelete