तीन गझला : प्रसन्नकुमार धुमाळ


१.

स्वभाव इतका खरा पाहिजे
खळखळणारा झरा पाहिजे

जरी देखणा नसे चेहरा
थोडासा हासरा पाहिजे

पैसा अडका नको म्हणाला
प्रेमाचा आसरा पाहिजे

दुःख जाणणारा एखादा
हक्काचा सोयरा पाहिजे

द्वेषाला ना जागा द्यावी
असा घरा उंबरा पाहिजे

हुंदडणाऱ्या तरुण पिढीला
कुठेतरी कासरा पाहिजे

मायपित्याच्या घोर श्रमाची
जाणिव त्याला जरा पाहिजे

२.

आपल्यांशीच तू भांडतो माणसा
रीत सोडून का वागतो माणसा?

बाप वृद्धाश्रमी माय रस्त्यावरी
श्वान लाडात तू पाळतो माणसा

हात अन् पाय मजबूत आहे तरी
भीक रस्त्यावरी मागतो माणसा

केवढी हाव ही,केवढी लालसा
सून हुंड्यामुळे जाळतो माणसा

जाण थोड्या बळीच्या मुक्या वेदना
मोल नाही तरी राबतो माणसा

मित्र शंभर नको पण असा ठेव तू
जो तुझ्या भावना जाणतो माणसा

शान दोन्ही घरांची सदा राखते
लेक गर्भात का मारतो माणसा?

३.

कलियुगाच्या घातकी काळात आपण
कोणत्या ना कोणत्या वादात आपण

नेमकी ज्यांची खुली चर्चा असावी
त्याच गोष्टी बोलतो कानात आपण

आपले परके अता काही कळेना
कोणत्या आहोत मग नादात आपण

ही गुरुकिल्ली यशाची मानतो मी
गुंग व्हावे नेहमी कामात आपण

कोण नसतो सोबती कायमस्वरूपी
फक्त घ्यावे एवढे ध्यानात आपण
.................................
प्रसन्नकुमार धुमाळ
तोडकर टाऊनशीप, ससाणेनगर
हडपसर-411028
Mobile No.8830801103
What's App.7875878866

2 comments: