दोन गझला: सौ. प्रीती वाडीभस्मे




१.
भावभक्ती ढोंग केवळ वाढली आता नव्याने
पंडिताचे वर्ग झाले, मंदिरे झाली दुकाने

एक चिमणी आसऱ्याला चालुनी दारात आली 
काळजाचे दार तेव्हा बंद केले माणसाने 

थांब ना रे पावसा तू, पूर डोळ्याचा सरू दे
पेटवाया चूल आणिक राहिली नाही मकाने 

तर्क माझा फोल ठरला मी उथळ पाणी समजले  
पाय पडता खोल नेले वेदनेच्या भोवऱ्याने 

त्रास होतो फार हल्ली माणसांच्या वागण्याचा 
याचसाठी दूर असते, चालतेही अंतराने 

पीक होते डोलणारे, वादळाशी बोलणारे
राहिले हे फक्त नयनी रिक्त स्वप्नांचे रकाने 

पुस्तकांना चाळल्याने पुस्तकी मज ज्ञान होते 
माणसाचा भाव कळला माणसांना वाचल्याने 

२.

उडावयाची मनात इच्छा अनंत आहे
एक पाखरू माझ्यामध्ये जिवंत आहे

ज्याच्या अंगी सेवावृत्ती अविरत असते
माझ्या दृष्टी तोच तपस्वी महंत आहे

दुःखालाही मिरवू म्हणते सुखासारखे
नवी पालवी देणारा तो वसंत आहे

शहरामधली भुरळ नांदते डोळ्यावरती
गावरान पण नखरा मजला पसंत आहे

वैरभाव जो कधी कुणाशी ठेवत नाही
वैरागी तो माणूस भक्त कि संत आहे?

शांत शवाला बघून मजला असे वाटते 
ही श्वासांच्या फेऱ्यांमधली उसंत आहे

.................................
प्रीती वाडिभस्मे, वर्धा

No comments:

Post a Comment