१.
नेमकी गझलेतली असते कट्यारी
लागते बस ओळ एखादी जिव्हारी
तू कधी येऊ नको दारात माझ्या
मी तुला देईन नक्की ही उधारी
रोग नव्हता आजवर कुठलाच झाला
फक्त प्रेमाची तुझ्या जडली बिमारी
एकमेकांना कधी कळलोच नाही
फक्त भेटत राहिलो आपण दुपारी
भावनेला लावते नख वेदनेचे
जाच करते आठवांची सावकारी
ओंजळीतुन बालपण निसटून गेले
हरवली जगण्यातली तेव्हा खुमारी
येत नाही जर कुणाच्या फायद्याला
काय कामाची अशी नुसती हुशारी
२.
आज त्याचा रंग हिरवागार नाही
वाळल्या झाडास त्या आधार नाही
वाटणी मागू नको प्रेमात अर्धी
प्रेम म्हणजे कोणते घरदार नाही
एकदा एका चुकीला माफ केले
माफ करणे शक्य वारंवार नाही
मीच झालो चंद्र हा माझ्या नभाचा
आज या डोळ्यांपुढे अंधार नाही
रोज प्रेमाने मला तू हाक द्यावी
एवढीशी एक इच्छा फार नाही
एवढा ठेवू नये विश्वास मित्रा
तोडल्यावर जो तुला पचणार नाही
३.
जन्मभर ही आग इच्छांची धुमसते
भावनेची भाकरी अलगद फुगवते
सारखा मागे तिचा आभास होतो
सावली माझी मला आता फसवते
हिंडणारी रात्र साऱ्या अनुभवांची
आठवांचे चांदणे कायम पुरवते
हिंडते हृदयात वादळ आसवांचे
आर्त डोळ्यांच्या किनाऱ्यावर धडकते
हरक्षणाला मन तिथे ओढून नेते
फार हळवी वाट स्वप्नांची खुणवते
कल खरा असतो तिचा दुसऱ्या ठिकाणी
ती तरीही मन तिचे इकडे रमवते
संयमाचे घालतो टाके कितीदा
या मनाची गोधडी कायम उसवते
.............................
संकेत येरागी
No comments:
Post a Comment