तीन गझला : दिलीप सीताराम पाटील


१.

वेगळे ना गाव येथे, वेगळे ना रानही
तोच हा सन्मानही अन् तोच आहे रागही

भेटतो कोणी कधी अन् नकळता भरतो मनी
अंतरी वादळ उठे उरते जरा ना भानही

मोडली कोठे अजुनही आखली चौकट कुणी
लाख धडपडले कुणी गेले कितीही प्राणही

कोण देतो लक्षही माझी तुझी ओरड जरी
शेवटी वायाच जाते आपुले मतदानही

तेच नारे, तीच भाषा, तेच वारे आजही
ती गरीबी, तीच आशा, तेच सारे आजही

२.

वादळी ठरणार तो, माहीत होते
अन् सदा लढणार तो, माहीत होते

लाख आली संकटे पुढती तरीही
ना कधी ढळणार तो, माहीत होते

तो असा घडला सदा अपमान साहत
पण नवा घडणार तो, माहीत होते

वर्णद्वेषाच्या खुळ्या गर्दीत कायम
एकटा पडणार तो, माहीत होते

जे सदा दुःखात खितपत, त्या मुक्यांना
पाहुनी द्रवणार तो, माहीत होते

फोडुनी मस्तावलेल्या कातळांना
माणसे जपणार तो, माहीत होते

जे युगेही कैद होते त्या पिलांसह
अंबरी उडणार तो, माहीत होते

जे कुणालाही कधी जमलेच नाही
शक्य ते करणार तो, माहीत होते

या धरेवर सूर्य तो क्रांतीयुगाचा
ना कधी लपणार तो, माहीत होते

एवढा ज्ञानी जणू की ज्ञानसिंधू
ना कधी सरणार तो, माहीत होते

टाळले त्याला जगाने नेहमी पण
शेवटी कळणार तो, माहीत होते

३.

पोथ्यांमधल्या शब्दांचा मी संग सोडला आहे 
पुराणातल्या अर्थांचा मी संग सोडला आहे

कळवळणाऱ्या आर्त वेदना कळल्या नाही ज्यांना
त्या वस्तीच्या रस्त्यांचा मी संग सोडला आहे

संत तुक्याच्या अभंगातल्या मानवतेला पुजतो
बडव्यांच्या त्या दंभांचा मी संग सोडला आहे

किती माजले स्तोम जगी ह्या रंगांचे धर्मांच्या
अहं दाटल्या रंगांचा मी संग सोडला आहे

पाप पुण्यही पसरत आहे पाय भीतिच्या दारी
स्वर्ग नरक त्या चक्रांचा मी संग सोडला आहे

साध्य जाहले काही कोठे गुलामीत दगडांच्या
मुर्खपणाच्या तर्कांचा मी संग सोडला आहे

मी सूर्याचा अंश जगी या प्रकाश वाटत फिरतो
अंधाराच्या धंद्यांचा मी संग सोडला आहे

...............................
दिलीप सीताराम पाटील

No comments:

Post a Comment