१.
बघा मुर्दाड कसले जाहलो आहोत आपण
कधीचे सोंग घेउन झोपलो आहोत आपण
गुलाबांना कुठे स्वातंत्र्य जगण्याचे मिळाले
जरी काट्यांबरोबर झुंजलो आहोत आपण
सतत का पोळण्याची राहते भीती मनाला
उन्हाच्या तीव्रतेने ग्रासलो आहोत आपण
जरासा टाकला चारा गुरांना,आणि कळले
भुकेच्या दावणीला बांधलो आहोत आपण
समुद्राखालचे मोती कसे मिळतील सांगा?
मजा मारत तिरावर थांबलो आहोत आपण
उगवलो त्याच जागेवर दिसू आपण उद्याला
जरी मातीमधे या गाडलो आहोत आपण
खडे मारून डोहाला असा आनंद लुटला
तरंगांच्या ध्वनीवर नाचलो आहोत आपण
कसे नाते तुझे माझे तुटावे सांग कविते!
गझलच्या साखळीने बांधलो आहोत आपण
२.
खिळे ठोकून हृदयावर व्यथा जोपासता येते
किती खंबीर आहे मन जगाला दावता येते
कसे येणार दुःखानो तुम्ही चालून माझ्यावर
सुखाच्या रक्षणासाठी मलाही भांडता येते
उन्हाशी झुंज देण्याची तयारी ठेवली ज्याने
(तयाला सावली खेचुन घरावर आणता येते)
तुझ्या गादीदुलाईची मला येथे गरज नाही
मला रेल्वेफलाटावर सुखाने झोपता येते
फुलांपासून शिकलो मी इथे जगण्यास लोकांनो
मला काट्यांमधे सुद्धा स्वतःला ठेवता येते
त्सुनामी पाहिली नाही तिने माझ्यातली केव्हा
तिला अंदाज अतिवृष्टी कदाचित लावता येते
शिवाने ठेवला आहे कृपेचा हात डोक्यावर
सतिशला त्यामुळे बहुधा हलाहल प्राशता येते
३.
कोणत्या बागेतली आहेस तू
केवढी गंधाळली आहेस तू
शांतता रक्तात असताना तुझ्या
का अशी रागावली आहेस तू?
पाखराचा नेमका खोपा जिथे
तीच फांदी छाटली आहेस तू
विठ्ठलाची काय माफी मागतो
वीट कोठे चोरली आहेस तू ?
वाटते काट्यातुनी आली जशी
एवढी रक्ताळली आहेस तू
त्याग माझा तू करू नाही शकत
काय माझी सावली आहेस तू
सभ्यतेबाहेर जाऊ मी कसा
संयमाने वागली आहेस तू
.................................
सतिश गुलाबसिंह मालवे
मुऱ्हादेवी,अमरावती
मो. 9527912625
वाह! सतिश भाऊ, तिन्ही गझला खूप आवडल्यात.
ReplyDeleteमनपूर्वक धन्यवाद अतूल भाऊ
Deleteछान रचना सर
ReplyDeleteआभार सर
Deleteखूप छान
ReplyDeleteबढिया
ReplyDelete