तीन गझला : सौ. दिपाली वझे


१.

सांगायला स्वतःची असतात माणसे 
भेदून काळजाला चिरतात माणसे

शब्दास अर्थ देणे मी सोडले अता
डोळ्यात वाचली तर कळतात माणसे

आधार सावलीचा घेऊ नका कुणी
वाटेत एकटी मग उरतात माणसे 

हाकेस धावणारे ते लोक मोजके
अवघ्या जगात नुसती फिरतात माणसे

हातात हात अपुले धरतात माणसे
फिरवून पाठ नंतर वळतात माणसे

२. 

वाढलेलं खायलाही वेळ नाही 
घास कोणा द्यायलाही वेळ नाही

व्यस्ततेची सांग राजा तू कहाणी 
श्वास आता घ्यायलाही वेळ नाही

जीवनाची तू अवस्था काय केली
थेंब अश्रू व्हायलाही वेळ नाही

अर्थ खोटे लावले व्याकुळ मनाचे
काय ते सांगायलाही वेळ नाही

पाहणे त्याचे नि माझे होत असते
पण क्षणी भेटायलाही वेळ नाही

३.

जीवना का रे तुला जगता न आले
अन् मलाही मोकळे रडता न आले

स्वार्थ लोकांच्या कसा रक्तात आला
एकमेकांचे उणे भरता न आले

आठवण बागेत आली बाकड्याला
पान गळले त्यास आवरता न आले

आठवांची वात या ह्दयात जळते
एकट्याने आज वावरता न आले

दोष देते आरशाला मीच माझ्या 
दोषही माझे मला बघता न आले
......................................
सौ. दिपाली महेश वझे, बेंगळुरू

4 comments:

  1. दिपाली, सुंदर गझल

    ReplyDelete
  2. आपले आभार 🙏🙏

    ReplyDelete
  3. व्वाह व्वाह ! खूप छान!!अभिनंदन

    ReplyDelete
  4. Wah👌👌❤️❤️💐💐

    ReplyDelete