तीन गझला : विजय जोशी


१.

दिली बातमी स्वत:च माझ्या निवर्तल्याची,
चढाओढ मी इथे पाहिली गुणगानाची

वारी भजने यात्रा बित्रा नको दिखावा,
मनी असावी भक्तिभावना मांगल्याची

जगून घेऊ आनंदाने दिवस आजचा,
अति न करावी वृथा काळजी दूर उद्याची

नकोत नुसते शब्द दिखाऊ साच्यामध्ये,
जोड असावी भाव-आशया- सौंदर्याची

विचार तत्त्वे निष्ठा सारी लयास गेली,
सत्ता,पैसा,खुर्ची ; शर्यत प्रत्येकाची

२.

देवासमोर रिश्वत ठेवून मागतो मी
पिंडासमोर सुद्धा बोलून पाहतो मी

दुबळी हताश जनता गरिबीत त्रस्त आहे
वादे जुने नव्याने रेटून फेकतो मी

काहीच ना भरवसा येथे कुणा कशावर
आता मलाच सुद्धा वदवून सांगतो मी

आयुष्य हाच मोठा आहे जुगार फसवा
पत्ते इथे सुखाचे फिरवून मांडतो मी

सत्तेतली अनीती इतिहासही दुजोरा
माझ्याच माणसांना डांबून ठेवतो मी

३.

उशीर झाल्यावरती आता देवा भजेन म्हणतो,
उपाय सारे करून थकलो वारी करेन म्हणतो

भविष्यातल्या पुंजीसाठी वर्षे सरून गेली,
जगावयाचे राहुन गेले आता जगेन म्हणतो

आई-बाबा होते जवळी किंमत नाही कळली,
हार घातला भिंतीवरचा फोटो स्मरेन म्हणतो

ताकद असते मौनामध्ये नकोच बडबड भारी,
शब्द मोजके मुद्द्यावरती तितके वदेन म्हणतो

स्वप्ने होती सुंदर विणली झिरमिर विरली सारी,
पण कष्टाची चादर आता पक्की शिवेन म्हणतो

क्षणभंगुर हे जीवन आहे उगाच रडलो कुढलो,
निसटुन गेले जीवन सारे आता हसेन म्हणतो

खूप खेळलो शब्दांशी अन् फिरलो वृत्तांमधुनी,
अता कुठेशी अंकुर फुटला कविता शिकेन म्हणतो

.................................
© विजो (विजय जोशी)
डोंबिवली (मालवण - सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२

2 comments:

  1. खूप छान सर! अभिनंदन सर!

    ReplyDelete
  2. खूप सुंदर गझला 🌹🌹

    ReplyDelete