१.
जिंदगी ही मला साजरी पाहिजे
वेदनाही उरी हासरी पाहिजे
पीक दगडातुनी काढुनी दावतो
पावसाची जरा खातरी पाहिजे
बंद कर तू तुझी तीच ती भाषणे
आज पोटास या भाकरी पाहिजे
ताल धरतील या गोपिका आजही
फक्त कृष्णा तुझी बासरी पाहिजे
काय मागू तुला आज मी विठ्ठला?
लेक माझी सुखी सासरी पाहिजे
सांग शेती अता ही करावी कुणी?
आज सर्वास जर नोकरी पाहिजे
२.
मनाच्या आतली ही सल कुणाला काय सांगू मी
जिणे झाले किती हतबल कुणाला काय सांगू मी
जराशा कारणाने तू जगाशी फारकत केली
कुणी पुसले तुझ्याबद्दल कुणाला काय सांगू मी
तुझ्या डोळ्यात भुललो मी उभे आयुष्यही माझे
नयन जैसे तुझे जंगल कुणाला काय सांगू मी
नको आणू पुढाऱ्याला जणांना शांत करण्या तू
पुन्हा जर पेटली दंगल कुणाला काय सांगू मी
तुला मी बोललो होतो नको हा लोभ व्याजाचा
कसे बुडले तुझे मुद्दल कुणाला काय सांगू मी
ढगाच्या आत पाण्याचा जरासा थेंबही नाही
कुणी केली पिके कत्तल कुणाला काय सांगू मी
.................................
राजेश देवाळकर
No comments:
Post a Comment