१.
तसा न होतो कधी कुणाचाच लाडका मी
परंतु आलो तुझेच ऐकत 'नका, नका' मी
जहाज आता कधी बुडालेच तर बुडू दे
तुझ्याच साठी नवी उभारेन द्वारका मी
दरी मिटावी तुझ्या नि माझ्या मधील कैसी
उदंड साऱ्या तुझ्या अपेक्षा न् मोजका मी
तुझे जसे दान दानतीहून थोर झाले
लगेच लोकांस वाटलो हाय फाटका मी
शिरेल जो वाकड्यात कोणी अता जराही
अचूक वर्मीच घाव घालीन नेमका मी
तुला अता सारखे रडायास येत असता
पडू दिला आपुला न बाहेर हुंदका मी
तुलाच मानून राहिलो मायभू तरीही
अजून माझ्याच मातृभूमीत पोरका मी
गलिच्छ वस्त्या गचाळ गावे उजाड रस्ते
तरी म्हणू काय देश हा नीट नेटका मी
पडेन मी एकटा पुरा ह्या जगास नक्की
म्हणून केला तयार माझा न घोळका मी
पडे सुखाचा सडा तुझ्या संगतीत आता
बघू कशाला उगाच तारे न् तारका मी
करायची काळजी किती अन् कुणाकुणाची
बघून ह्या वासनांध छायेत बायका मी
२.
होतील पाखरे जर स्वच्छंद एवढ्याने
वाटेल स्फोट कोणा आक्रंद एवढ्याने
त्याने बरेच काही बघ भोगले असावे
कोणीच होत नाही बेबंद एवढ्याने
चालूच कारवाया त्यांच्या जरी विरोधी
होणार मात्र नाही मी बंद एवढ्याने
वेगासवे तुझ्या जर मी धावलोच नाही
लेखी तुझ्या कसा मग मी मंद एवढ्याने
झालो बरा कुणाच्या नाहीच औषधीने
झाला किती तयांना आनंद एवढ्याने
माझ्यावरी फिदा ही झाली फुले गुलाबी
होणार काय सांगा गुलकंद एवढ्याने
घालून फक्त पाणी केली जरी प्रतीक्षा
यावा फुलून कैसा जास्वंद एवढ्याने
गाता कधीतरी मी सारे विचारती 'कां'
गेला अखेर वाया हा छंद एवढ्याने
३.
माजला चोहीकडे आकांत आहे
माझिया हा गावचा वृत्तांत आहे
कालच्या दंग्यात जो सामील होता
चेहरा तो केवढा संभ्रांत आहे
तू जरी बंदिस्त हे आवार केले
मुक्त केव्हाचाच माझा प्रांत आहे
लाख तू नाकार हे अस्तित्व माझे
फक्त येथे मीच होकारांत आहे
सारखा देतोय सत्याचे धडे अन्
बोलतो खोटे किती धादांत आहे
कोणता बोलेल आता रामशास्त्री
फक्त प्रायश्चित्त जर देहांत आहे
जीव होतो घाबरा गर्दीत केव्हा
आणि सक्तीचा कधी एकांत आहे
'युद्ध अन् प्रेमात सारे क्षम्य असते'
हा भ्रमिष्टांचा खुळा सिद्धांत आहे
डोंब आगीचा जरी डोक्यात आहे
स्फोट होईतो तरी मी शांत आहे
गोड साऱ्यांशी सदा बोलून त्यांनी
आणली माझ्यावरी संक्रांत आहे
एकटी शाळेस जाते लेक माझी
बाप माझ्यातील चिंताक्रांत आहे
.................................
सिद्धार्थ भगत
No comments:
Post a Comment