तीन गझला : रमेश सरकाटे

१.

जगणे कसे जगावे अंधार पीत आम्ही 
करतो विद्रोह सारे दुखणे लिहीत आम्ही

हल्ले कितीक केले आम्हां वरीच त्यांनी 
कापून काढले ना होऊन जीत आम्ही

झाले पिढ्यापिढ्यांना दुर्लक्ष शिक्षणाचे 
ना पाळतो अता ती मुर्दाड रीत आम्ही

जगतो खुशीत आता भीमामुळेच सारे
चिंतेत का जगावे अन भीत भीत आम्ही

आहो पुढारलेले  सारेच  शिक्षणाने
करतो सदैव आता वैऱ्यास चीत आम्ही

संघर्ष रोज केला उद्देश गाठण्याला
बसलो मुळीच नाही दुःखे करीत आम्ही

देतो अभय तयांना येतात शरण जे जे 
पेरत तथागताची ही 
धम्म-प्रीत आम्ही 

२.

सदा कदा फुशारकी कशास मारतोस तू 
भ्रमिष्ठ ह्या जगास का घमेंड  दावतोस तू

नसे कुणा तमा तुझी असे तहानला जरी 
चुकार स्वप्न कोरडे उगीच पाहतोस तू

नसेल रोजगार जर उपास ठेव रोज तू
रडून दोष शासना खुशाल ठेवतोस तू

उदास जीवनात ह्या उजाड मार्ग चालता 
नको तिथे झुकून का उगाच भाळतोस तू

उधाणल्या मनास रे कितीक आवरायचे
गुपीत का मनातले हसून सांगतोस तू

प्रवास संपल्यावरी अजून राहतोस का 
सुखास पकडण्या उगा कशास धावतोस तू 

जुन्या गलीतले कसे जुनेच याद येतसे 
मनातल्या स्मृतीस का
अजून चाळतोस तू

३.

तुझी औकात आहे तर जगाला पण कळू दे ना 
कुणाला मुंग छातीवर निराशेने दळू दे ना 

कपाळी भाग्य लिहिले ना असे रेषेत हाताच्या
बघ्यांना जोरका झटका विचाराने  हळू दे ना 

किती अन्याय होतो बघ इथे तर द्रौपदीवरती
कुठे आक्रोश बघताना मनाला सळसळू दे ना 

नको घाई करू इतुकी तुझ्या एका नकाराची 
घरावरचे दुखी वादळ जरा माझे टळू दे ना

किती रे पाळतो खोट्या नकोशा अंध श्रद्धा तू
मनाच्या ह्या विकारांना विपश्येने जळू दे ना

दिलासे संविधानाने दिले आम्हा जरी आहे 
असे जे हक्क सरकारी घरी माझ्या वळू दे ना 

घराबाहेर आईला नको काढू कधी भाऊ
तिचे उपकार थोडे पण तुझ्यावरचे ढळू दे ना

No comments:

Post a Comment