तीन गझला : चैतन्य कुलकर्णी


१.

वारा तर खिडकीशी बोलत आहे
फरशी का मग इतकी तापत आहे

माकड होते आहे बघणाऱ्याचे
ती मगरीचे अश्रू ढाळत आहे

पानावरची जागा पुरली नाही
खयाल सध्या खोली मागत आहे

धूळ चारली याआधी नियतीने
प्राक्तन आता पाणी पाजत आहे

अपुले फसणे नवे आपल्यासाठी
काळ योजना जुनीच आखत आहे

गरजेपुरता सौदा केला आपण
सौदा आहे म्हणून भागत आहे

रोज परीचे हाल पाहतो आम्ही
आजी खोट्या गोष्टी सांगत आहे


२.

ऐकणाऱ्या माणसाचा कान सोकावू नये
पाखराने एवढेही गोड किंचाळू नये

रोज दुःखाची उन्हे मी या अटीवर सोसली
दोन डोळ्यांच्या तळाशी सावली साचू नये

ऊब प्रेमाची हवीशी वाटते काही दिवस
प्रेम करताना तरीही भाकरी जाळू नये

ताटवाट्यातून होऊ द्या मिठाची कौतुके
मोहरीच्या वेदनेचा थांगही लागू नये

ही तुझी दानत ठरावी आणि माझी सूज्ञता
तू मला देऊ नये अन मी तुला मागू नये


३.

दुपार म्हणते जमेल तितके टाळ मला
रोज बिलगते आहे संध्याकाळ मला

ओळींमध्ये घुटमळणे तू सोड जरा 
एके दिवशी नुसते वरवर चाळ मला

पुन्हा पाहतो भेदरलेले पाडस मी
पुन्हा आठवत जाते माझी नाळ मला

दुष्कर्मांनी नासत गेला हात किती
टोचत आहे नामजपाची माळ मला

रोवू आता बीज कोणत्या कवितेचे
उकरू बघतो पुन्हा व्यथेचा फाळ मला

हुज्जत घालत बसतो भाजीवाल्याशी
बस! लिहिताना सतावतो दुष्काळ मला
.................................

© चैतन्य कुलकर्णी 'शुऊर'

No comments:

Post a Comment