तीन गझला : मीनाक्षी गोरंटीवार

१.

खोल तळाशी दु:खांना मी लपवत गेले आयुष्या
म्हणून बहुधा तुला नव्याने  घडवत गेले आयुष्या

सुख दु:खाची ऊन सावली आली जेव्हा वाट्याला
आशेचे मी रोप अंतरी रुजवत गेले आयुष्या

कुठे भरवसा उरला होता हाय घेतल्या श्वासांचा
म्हणून जगणे क्षणक्षण माझे सजवत गेले आयुष्या

संसाराच्या प्रवासामधे लाख संकटे विवंचना
गझल भेटली अन् काट्यांना तुडवत गेले आयुष्या

तुला द्यायचे तसे दान तू बेलाशक दे आयुष्या
कर्तृत्वाने असे तरी मी बहरत गेले आयुष्या

नकळत माझ्या अवतीभवती व्यथा पसरली वेगाने 
त्या वलयाला अनुभव मानत मिरवत गेले आयुष्या

गुंतत गेली नाती सारी संशयातल्या  धाग्यांनी
आपुलकीने बसल्या गाठी उसवत गेले आयुष्या


२.

भेदत जाते  क्षितिजाला ती आव्हानांना कचरत नाही
बाईपण हे पेलत जाता व्यथा मनाची मिरवत नाही

मृगजळ होते फक्त सुखाचे वेड्यासम मी धावत गेले
इतके कळले सहजासहजी सुख हाताला गवसत नाही

तुला सांगते वाटेवरती आयुष्याच्या तू असताना
फक्त चालते ऊनसावली, खाचा खळगे मोजत नाही

जीवलग सखा सोबत नाही किती दुरावा छळतो आहे
मंतरलेला तुझा नि माझा ऋतू गुलाबी विसरत नाही

काळजावरी भळभळणारी जखम खोल तो करून गेला
दु:खाला त्या टाचत गेले, काळजास मी उसवत नाही

झाले गेले घडून गेले बनव नव्याने छबी  माणसा
लाचलुचपती काळा पैसा कधीच याला बरकत नाही

लाखो झाले बेघर येथे  सारेकाही  झाले स्वाहा
मानवतेला  लाजविणारे युद्ध तरीही थांबत नाही


३.

पडझड झाली ज्या नात्याची ते टाळावे म्हणते
मार्गावरुनी  वेगवेगळ्या  मी चालावे म्हणते

व्यर्थ डांबुनी  ठेवल्या व्यथा खोल मनाच्या डोही
मुक्त होउनी घळघळ साऱ्या वाहू द्यावे म्हणते

उगा कशाला  ह्या जीवाचे  दुःख  कुणाला सांगू ? 
खोटे हसरे जरा मुखवटे मी ओढावे म्हणते

पैलतिरावर कृष्ण सख्याची तेथे वेणू वाजे
ऐलतिरावर व्याकुळ राधा श्यामल व्हावे म्हणते
               
पहाट वारा बिलगत जातो जेव्हा मजला वेडा
पुन्हा एकदा मिठीत अलगद तुझ्या शिरावे म्हणते

खोट्या नाट्या परंपरांवर विश्वास नसे माझा
झुगारून ते रिवाज सारे  डोळस  व्हावे म्हणते

आयुष्याच्या खडतर वाटा तुडवत गेले पायी
दमले आता घडी दोघडी  मी थांबावे म्हणते
 
- मीनाक्षी गोरंटीवार 


1 comment: