गझल ‘लिहिणे’ बंद करा ! : हेमंत पुणेकर

 


                शीर्षक वाचून वाटेल लेखकाचे डोके फिरले की काय? पण तसे नाही. खरेतर गझल हा लिहिण्याचा नसून सांगण्याचा काव्यप्रकार आहे. उर्दूत “गज़ल लिखना” नाही तर “गज़ल कहना” असेच म्हटले जाते. गझलच काय मुळात कविता ही कानाचीच कला आहे. ती लिपीला बांधील नसते, नसावी!

तर काय फरक आहे गझल ‘लिहिण्यात’ आणि ‘सांगण्यात’ याचा विचार करू. वृत्त लिपीवरून ठरते की उच्चारावरून?

'ये महलो ये तख्तो ये ताजो की दुनिया
ये इंसा के दुश्मन समाजो की दुनिया
ये दौलत के झूठे रवाजो की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है? '

साहिर लुधयानवीची ही प्रसिद्ध नज़्म कोणत्या वृत्तात आहे हे फक्त लिपीकडे पाहून कळते का? नाही कळणार. आता मनाचे श्लोकांच्या चालीवर पठन करून बघा.

ये* महलो   ।   ये* तख्तो  ।  ये* ताजो  ।  की* दुनिया
ये* इंसा   ।   के* दुश्मन   ।  समाजो   । की* दुनिया
ये* दौलत   ।   के* झूठे   ।   रवाजो   । की* दुनिया
ये* दुनिया   ।  अगर मिल   ।  भी* जाए  ।   तो* क्या है?

            आहे ना भुजंगप्रयात? मूळात ज्या अक्षरांनंतर तारांकित चिन्ह दिले आहे त्या गुरू अक्षरांचा लघु उच्चार केल्याने भुजंगप्रयात मधे पठन शक्य होते. तर अगदी अरबी-फारसी पासून ते उर्दू, हिंदी आणि गुजराती गझलेत लघु-गुरू अक्षराच्या उच्चारावरून ठरवतात, लिपी पाहून नाही. अरबी, फारसी आणि उर्दूची लिपी आपल्या लिपीसारखी उच्चारानुसारी नसल्याने लिपी पाहून लघु-गुरू समजतही नाही. त्यांची लिपी काही प्रमाणात इंग्रजीच्या रोमनलिपी सारखी आहे. उदाहरणार्थ 'स्काय 'चे लिखाण पाहून 'गाल ' वजन लगेच दिसते. पण sky लिहिलेले पाहून त्याचे 'गाल ' वजन दिसत नाही. म्हणून अरबी, फारसी आणि उर्दू गझल परंपरेने उच्चारावरूनच लघु-गुरू ठरवले.
लघु-गुरू ठरवण्याच्या या उच्चारानुसारी पद्धतीलाच मराठी गझलकार डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी 'लवचिकता ' असे म्हटले आहे. वृत्तात भाषेचा लवचिक वापर केल्याने गझलरचना सहज होते.
            गझल मराठीत आली तेव्हा अक्षरगणवृत्तांमधे भाषेचा लवचिक वापर करायची ही पद्धत मराठी गझलकारांनी स्वीकारली नाही. ते भारतीय परंपरेच्या लघु-गुरूच्या व्याख्येवर ठाम राहिले. लेखकाच्या नम्र मते मराठी गझल अक्षरगणवृत्तांपासून दूर जाण्याचे हेच मुख्य कारण आहे. आजची दर तिसरी मराठी गझल मात्रावृत्तांमधे लिहिली जात आहे. 'गझलकार ' सीमोल्लंघन २०२१ ' मध्ये प्रकाशित ३५२ गझलांपैकी ११३ गझला मात्रावृत्तांमधे आहेत. हे प्रमाण ३२.१% आहे. म्हणजेच काय तर आज लिहिली जाणारी दर तिसरी मराठी गझल मात्रावृत्तात आहे. गझलेच्या बाराखडीत सुरेश भटांनी लिहिले आहे 'गझल शक्य तोवर अक्षरगणवृत्तात लिहावी '. त्यांनी पण काही गझला मात्रावृत्तांमधे लिहिल्या पण त्यांच्या बहुतांश गझला अक्षरगणवृत्तातच आहेत. उर्दूत मात्रावृत्तांना Iबहर-ए-मीर ' म्हणतात पण या वृत्तातल्या गझलांचे प्रमाण ५% पेक्षा जास्त नाही. १५० वर्षांची परंपरा असलेल्या गुजराती गझलेत पण मात्रावृत्तातल्या गझला जवळपास त्याच प्रमाणात आहेत. मग मराठी गझलेची वाटचाल वेगळ्या दिशेने का होतेय? भट ज्या 'विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी ' बोलत होते ती पिढी दर तिसरी गझल मात्रावृत्तांमधे का लिहित आहे? त्यांना अक्षरगणवृत्तात लिहिणे शक्य होत नाहीये का? असे होण्याचे कारण लवचिकतेचा अस्वीकार हेच आहे.
                अक्षरगणवृत्ते आणि त्यात भाषेचा लवचिक वापर यांची चर्चा करण्यापूर्वी अक्षर म्हणजे काय आणि गणवृत्ते म्हणजे काय हे बघू.

अक्षर

        माधव त्रि. पटवर्धन त्यांच्या १९३७ मधे प्रकाशित 'छ्न्दोरचना' च्या ६७व्या पानावर अक्षराची व्याख्या अशी - 'अक्षर म्हणजे एकावेळी तोण्डातून बाहेर पडणारा ध्वनि होय, मग तो ध्वनि लिहून दाखवायला लिपीतील चिन्ह एक लागो वा अनेक लागोत. अक्षरांचे अधिष्ठान स्वरावर असते, मग त्यात आरंभी वा अंती व्यंजनोच्चार मिळो वा ना मिळो. 'राजन्' या शब्दाच्या  पाहून आपण यांत रा-ज-न् अशी तीन अक्षरे आहेत म्हणून म्हणतो; पण हे चूक आहे. वस्तुतः 'रा-जन्' अशी दोनच अक्षरे आहेत. शब्दांत जितके स्वर तितकीच अक्षरें होणार. 'रा ' हे अक्षर आकारांत म्हणजेच स्वरान्त आहे; तर 'जन्' हे अक्षर व्यंजनान्त आहे. स्वरांत अक्षराला विवृत्त म्हणतात आणि व्यंजनान्त अक्षराला संवृत्त म्हणतात.'

            'अक्षर ' या संज्ञेची माधवरावांनी दिलेली इतकी विस्तृत आणि स्पष्ट व्याख्या भाषा आणि वृत्तशास्त्रातल्या अनेक संकल्पना समजून घेण्यासाठी खूप महत्वाची आहे. उदाहरणार्थ 'कमल ' हा शब्द दिसायला जरी तीन लघुंचा बनलेला दिसत असला तरी त्याचा उच्चार 'क-मल् ' असा आहे आणि म्हणून त्यात दोनच अक्षरे आहेत हे कळते. 'करवत' चे पण तसेच. दिसायला चार वर्ण दिसत असले तरी ते अक्षरे नाहीत. उच्चार 'कर्-वत्' असा आहे म्हणजे दोन व्यंजनान्त/संवृत्त अक्षराने बनलेला हा शब्द आहे. कोणत्याही शब्दाचे वजन ठरवण्यासाठी 'अक्षर ' ही संकल्पना खूप उपयोगाची आहे. तसेच स्वरान्त म्हणजे विवृत्त अक्षर आणि व्यंजनान्त म्हणजे संवृत्त अक्षर या संकल्पना भाषेच्या लवचिक वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. विवृत्त गुरू अक्षर विशिष्ट स्थितींमधे लघु म्हणून घेता येते.

लघु आणि गुरु

        प्रत्येक अक्षराला उच्चारायला लागणारा वेळ ध्यानात घेऊन त्यांचे दोन प्रकार ठरविण्यात आले. पण हा वेळ सापेक्ष असतो हे मूळसूत्र लक्षात ठेवले पाहिजे.

१) तालाची एक मात्रा इतका वेळ घेणारे अक्षर म्हणजे लघु, ज्यात अ, इ, उ हे स्वर समाविष्ट असलेली स्वरान्त म्हणजे विवृत्त अक्षरे  आहेत.
२) तालाच्या दोन मात्रांइतका वेळ घेणारे अक्षर म्हणजे गुरु, ज्यात आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः स्वर समाविष्ट असलेले स्वरान्त म्हणजे विवृत्त अक्षरे आहेत.

३) सर्व व्यंजनान्त म्हणजे संवृत्त अक्षरे आहेत.

        उच्चाराचा एकम अक्षर (इंग्रजीत यालाच syllable म्हणतात) आणि त्याचे दोन प्रकार ठरवल्यावर आता त्याच्या आधारे वृत्तांची, म्हणजेच अक्षरांच्या विविध प्रकाराच्या संरचनांची व्याख्या या प्रकारे करता येते.

वृत्त

१) आक्षरछंद

        यात लघुगुरूचा भेद ध्यानात घेतला जात नाही  फक्त अक्षरसंख्या निश्चित असते. प्रत्येक अक्षराचा उच्चार दीर्घ केला जातो. म्हणजेच प्रत्येक अक्षर दोन मात्राचे- गुरु असते.

२) जाती किंवा मात्रावृत्त

        निश्चित मात्रांचे आवर्तन असलेले वृत्त. यात लघुगुरूचा क्रम पाळला जात नाही. केवळ प्रत्येक ओळीत मात्रांची संख्या निश्चित असते.

३) अक्षरगणवृत्त

लघु-गुरूंचा निश्चित क्रम असलेले वृत्त.

            आक्षरछंदामधे मोठ्या प्रमाणात संत साहित्य उपलब्ध आहे. लोकगीतांमधे देखील आक्षरछंदाचा मोठ्या प्रमाणात वापर दिसतो. अक्षरगणवृत्त मात्र जास्त बंधनकारक असून त्यात विपुल प्रमाणात साहित्यसर्जन झाले नाही आणि ते उच्चभ्रू साहित्यकारांपुरते सीमित राहिले. भारतीय काव्य परंपरेत अक्षरगणवृत्तांमधे रचना सुकर व्हावी म्हणून क्वचित  प्रमाणात सूट घेतली जाते. उदाहरणार्थ इ आणि उ स्वर असलेल्या स्वरान्त अक्षरांना गुरु आणि ई आणि ऊ स्वर असलेल्या स्वरान्त अक्षरांना लघु म्हणून घ्यायची सूट आहे. ही सूट घेऊनही भारतीय परंपरेत अक्षरगणवृत्तांचा वापर सीमितच राहिला. या उलट  उर्दू, हिंदी आणि गुजरातीत गझल अक्षरगणवृत्तातच लिहिली जाते. त्यात भाषेच्या लवचिक वापराची सूट असल्याने अक्षरगणवृत्तात रचना सुकर होते.

मराठीतर गझल परंपरेत अक्षरगणवृत्तांमधली सूट आणि बंधन

सूट

१) स्वरान्त (विवृत्त ) गुरु अक्षर सुटे किंवा शब्दान्ती येत असेल तर तो लघु म्हणून घेता येतो.

उदा-१

तारांकित अक्षरे लिपीनुसार गुरु दिसत असली तरी ती उच्चारात लघु घेतली आहेत.

ये* महलो ये* तख्तो ये* ताजो की* दुनिया
ये* इंसा के* दुश्मन समाजो की* दुनिया
ये* दौलत के* झूठे रवाजो की* दुनिया
ये* दुनिया अगर मिल भी* जाए तो* क्या है?

उदा-२

हरेक बात पे* कहते हो* तुम की तू क्या है?
तुम्ही कहो कि ये* अंदाज़े* गुफ्तगू क्या है?

मिर्झा गालिबचा हा प्रख्यात शेर 'लगाल गाललगा गालगाल गागागा” या वृत्तात आहे.

बंधन

लघु अक्षर कधीच गुरु म्हणून घेता येत नाही.


मराठी गझलेत भाषेचा लवचिक प्रयोग

अमोल शिरसाट यांचा एक शेर असा आहे -

'नातवांनाही अडाणी वाटते
जो तो* असतो नेहमी शिकवत तिला '

        लिपी कडे लक्ष दिले तर तो* गुरुच वाटेल पण गालगागा गालगागा गालगा या वृत्तात पठन केल्यावर सहज समजेल की तो* लघु म्हणून घेतल्यावर उच्चाराला किंवा संप्रेषणाला(communication) फारसे नुकसान होत नाही. असे प्रयोग मराठीत सध्यातरी फारसे होताना दिसत नाहीत. त्यामुळे लेखकाची 'भुजंग प्रयात ' वृत्तातली एक गझल नमुन्यादाखल देण्यात येत आहे. तारांकित अक्षरे लिपीनुसार गुरु वाटत असली तरी प्रत्यक्ष उच्चारात लघु केली आहेत. खाली दिलेली गझल 'मनाचे श्लोकां'च्या चालीवर पठन करून बघा.


'पुन्हा जन्मलीये मनात एक आशा
बघूया पुढे काय होतो तमाशा

तू* प्रत्यक्ष भेटू शकत नाही*, ठीकेय
तू* स्वप्नात पण येत नाही अताशा

कशाला तू देतेस कानांना* तसदी
जिथे बोलतात ओठ ओठांची* भाषा

महालात राहणारी* हृदयात राहशील?
जमेल का तुला या घरात एवढ्याशा?

सहज हिंडण्याची मजा घेऊ* हेमंत
कशाला हवाये नकाशा बिकाशा?

उपसंहार

                मराठीतर गझल परंपरेत अक्षरगणवृत्तांमधे भाषेचा लवचिक वापर होतो. असा लवचिक वापर मराठी गझलेने स्वीकारलेला नाही म्हणून ती मात्रावृत्तांकडे झुकत चालली आहे. भाषेच्या लवचिक वापराचा नियम अगदी सोपा आहे. सुटा किंवा शब्दांती येणारे गुरू अक्षर लघु म्हणून घेता येते. अशी सूट घेतली तरी शब्दाच्या उच्चारांना फारसे नुकसान होत नाही आणि अक्षरगणवृत्तांमधे रचना सुकर होते. गझल लिहिण्या पेक्षा सांगण्याकडे, वृत्तबद्ध पठनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उच्चार वृत्तात असायला हवे, केवळ लिपीनुसार अक्षरांना लघु- गुरु ठरवू नये. म्हणजेच काय तर…
गझल 'लिहू ' नका, गझल 'सांगा '!

................................
हेमंत पुणेकर

3 comments:

  1. Anjali Ashutosh MaratheOctober 7, 2022 at 4:33 AM

    परखड लेख.

    ReplyDelete
  2. सुंदर, नेमकं सांगणारा लेख

    ReplyDelete