गझल पण 'बोलकी' आहे ! :विनोद देवरकर

 



श्रीकृष्ण राऊत यांची एक आशयघन गझल नुकतीच वाचण्यात आली.  महामाया (लगागागाx२) या छोट्या वृत्तात लिहिलेली नितांत सुंदर गझल चिंतन आणि मनन करण्यास भाग पाडते. मुळात छोट्या वृत्तात अर्थसंपन्न गझल लिहिणे कठीणच काम. तसेही गझलेत फालतू शब्दांना जागा नसतेच, परंतु कमी अक्षरसंख्येत अनेकार्थसूचक, अर्थगर्भ आणि रसिकांच्या काळजाला थेट भिडणारी गझल लिहावयाची असेल तर गझलकाराची जबाबदारी आणखीनच वाढते. 

सुरेश भटांच्या एल्गार (१९८३) या गझलसंग्रहाच्या प्रकाशनानंतर अवघ्या सहा वर्षातच श्रीकृष्ण राऊत यांचा गुलाल (१९८९) हा गझलसंग्रह प्रकाशित झाला. कालखंडाचा विचार केल्यास ते गझलसम्राट सुरेश भटांचे समकालीन गझलकार. परंतु त्यांच्या दोघांच्या वयातील अंतराचा विचार केला तर मात्र सुरेश भटांनंतरच्या पहिल्या पिढीतील अग्रणी, मान्यताप्राप्त गझलकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. गेल्या चार दशकांपासून त्यांची स्वतंत्र अभिव्यक्तीची, तंत्रशुद्ध आणि आशयघन गझल मराठमोळ्या रसिकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. वैश्विक तत्वज्ञानात दडलेले चिरंतन सत्य गझलेच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहचवण्यात त्याचा हातखंडा. तर ती गझल -

जरा शैली जुनी आहे

गझल पण बोलकी आहे

तुझा संसार सौख्याचा

तुझी पत्नी मुकी आहे

जखम भरणार ही नक्की

दवाई झोंबरी आहे

तुझ्या डोक्यात कोरोना

तुझी तबियत कशी आहे?

अरे जी वंश वाढवते

परी नाही,बरी आहे !

किती निर्लज्ज टोकाची

इमोजी हासरी आहे

सुरा-तालात का कच्ची

नवी जर ढोलकी आहे


 - श्रीकृष्ण राऊत

प्रस्तुत गझल ही सात शेरांची गैरमुसलसल गझल. दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे, प्रतिमांचे चपखल उपयोजन त्यांनी गझलेत केले आहे. 'कोरोना ' 'इमोजी ' या आजमितीच्या प्रतिमांचा सुयोग्य वापर केला आहे. या मुरद्दफ गझलेत स्वर-काफियाचा उपयोग केला गेला आहे. स्वर-काफियाचा वापर गझलेतील शब्दयोजनेस अधिक लवचिकता प्रदान करतो. या गझलेत 'आहे' हा रदीफ असून मतल्याच्या दोन्ही मिसऱ्यात आणि नंतरच्या शेरांमध्ये शेराच्या फक्त सानी मिसऱ्यात पुनरावृत्त होतो. यामध्ये रदीफच्या आधी येणाऱ्या काफियाच्या शेवटी ‘ई‘ स्वर स्थिर असल्यामुळे याला स्वर-काफिया म्हणतात. गझलेत वापरलेले कवाफी बघितले तर हे लक्षात येईल-'जुनी ', 'बोलकी ', 'मुकी ', 'झोंबरी ', 'कशी ', 'बरी ', 'हासरी 'आणि 'ढोलकी ' या सर्वांचा शेवट ईकारांत आहे. गझलशास्त्र अभ्यासकांच्या मते मराठी गझलेने स्वर-काफिया फारसा स्वीकारलेला नसला तरी उर्दू-हिंदीत साधारणतः चाळीस टक्के गझला स्वर काफियांच्या आढळतात. राऊतांच्याही मोजक्या चार- पाच गझलाच स्वर काफियाच्या आहेत. त्या पैकीच ही एक. 

श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेची नाळ नव्या प्रतिमा, नवे संदर्भ वैश्विक तत्वज्ञानाशी जुळलेली असल्यामुळे ही गझल खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकातील गझल म्हणता येईल.

सुरेश भटांचा वारसा आणि वर्तमानाचा आरसा घेऊन गझललेखन करीत असल्यामुळे श्रीकृष्ण राऊत गझलेच्या मतल्यातच हे सत्य सांगून मोकळे होतात. ते म्हणतात,

'जरा शैली जुनी आहे

गझल पण बोलकी आहे'

'जुने ते सोडावे, नवे पांघरावे' या विचारसरणीच्या नव्या आणि जुन्या पिढीला हे ‘स्वीकारलेच‘ पाहिजे असे म्हटलेले आवडत नाही. कारण नव्या युगाची, विज्ञानाची, तंत्राची आणि बदलाची कास त्यांनी धरलेली असते. काळानुरूप बदल स्वीकारणे गरजेचेही असते. पण याचा अर्थ असा नव्हे की, जुने ते सगळेच कालबाह्य. त्यातही  आयुष्याला बळ, आनंद आणि झिंग आणणाऱ्या गोष्टी बहुतांश जुन्याच असतात. उदा. औषधामध्ये सर्वोत्तम रसायन म्हणजे मध, जेवढे जुने तेवढे चांगले. केवळ वाचन, चिंतन आणि मनन केल्यानेही आनंद देणारे, जीवनमूल्ये रुजवणारे वेद, ऋचा, उपनिषदे, संत वाङ्मय हेही जुनेच. आणि झिंग आणणाऱ्या मदिरेबद्दल तर सांगायलाच नको. पण हाडाचा कवी आणि अनुभवी वैद्य कडू सत्य व औषधालाही मधुर मुलामा देऊन गळी उतरवतोच. हेच कौशल्य राऊत यांनी आत्मसात केले आहे हे प्रस्तुत शेराच्या मांडणीतून लक्षात येते. गझल तंत्राच्या बाबतीत तडजोड न करताही आशयगर्भ मिसरे रसिकांशी प्रभावी संवाद साधू शकतात आणि साहित्यिक पुरोगाम्यांच्या मनावर अंकित होतात. 

माणूस जन्माला येताना एकटा अन् जातानाही एकटाच. पण त्याची निर्मिती मात्र स्त्री पुरुष एकत्र आल्याशिवाय होत नाही. एकत्र येण्याच्या, राहण्याच्या आणि सृजनाच्या प्रक्रियेस बळकटी देणाऱ्या संस्थेस संसार म्हणतात. मूलतः भिन्न शारीरिक, मानसिक वैशिष्ट्यांसह जन्माला आलेले, वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक वातावरणात वाढलेले दोन जीव एकत्र येऊन संसार थाटतात. अशावेळी एकमेकांना समजून घेत संसार सुरळीत होत असला तरी अनेक बाबतीत मतभिन्नता असणे स्वाभाविक असते. त्यामुळे प्रसंगी पती पत्नीमधे वादही होतात. विकोपाला जातात. अशावेळी दोघांपैकी एकाने शांत राहिले तर बहुतेक अप्रिय वाद शमतात. टाळले जातात. हे वैश्विक सत्य मांडतांना ते लिहितात-

'तुझा संसार सौख्याचा;

तुझी पत्नी मुकी आहे '

इथे कवी पुरुषप्रधान मानसिकतेचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे 'मुकी पत्नी' असा उल्लेख आला आहे. परंतु तो तसाच्या तसा न घेता स्त्रीप्रधान मानसिकतेने 'मुका पती' असे वाचले तरीही, परिणामी 'सौख्याचा संसारच' होणार आहे. संसारात दोघांपैकी एकाच्या मुका/ मुकी होण्याने जीवनात सुखाचा प्रवेश होणार असेल तर ते मुकेपणही सहर्ष स्वीकारले पाहिजे ही अनुभूती रसिकांच्या काळजात शिरतो. 

राऊत यांचे शेर स्वप्नरंजन विश्वात विहरत नाहीत. कपोलकल्पनेच्या कक्षेत अडकत नाहीत. वास्तविक परिस्थिती आणि शास्त्रीय अधिष्ठान त्यांच्या अभिव्यक्तीला असते. परंतु सर्वसामान्य रसिकाला शास्त्रीय पेक्षा व्यावहारिक ज्ञान महत्वाचे असते. वानगी दाखल हा शेर बघा- 

'जखम भरणार ही नक्की

दवाई झोंबरी आहे '

माणसाचे जीवन जसे षडरिपुने व्याप्त आहे तसेच त्यापासून उत्पन्न होणारे आजार दूर करण्यासाठी आयुर्वेदाने षडरसयुक्त औषधी सांगितलेल्या आहेत. जसे मधुर, अम्ल, लवण, कटु, तिक्त आणि कषाय. प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. पण या शेरात उल्लेख आहे तो जखमेच्या आणि त्यावरील औषधाचा. त्वचाविकार किंवा जखम दुरुस्त करण्यासाठी आयुर्वेद प्रामुख्याने कटुरसयुक्त औषधीचे सेवन करावयास सांगते. कटुरस हा जिभेला आणि त्वचेला झोंबणारा असतो जो प्रामुख्याने पित्तरोग नष्ट करतो. म्हणून प्रस्तुत शेरातून ते सांगतात की, सत्य हे झोंबणारे,  कडवे, अप्रिय जरी असले तरी  भ्रष्ट कृती, आचार आणि विचार यामुळे उत्पन्न होणाऱ्या मानवी जीवनातील सामाजिक आणि मानसिक व्याधी दूर करणारे प्रभावी औषध असते. औषध कडू, झोंबरे असले तरी त्याचे सेवन तज्ज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली घेतले तर रोग समुळ नष्ट होऊ शकतो.   

रोग निवारणासाठी औषधासोबतच आपले मन आणि बुद्धी कशी काम करते हे सांगताना कवी लिहितो-

'तुझ्या डोक्यात कोरोना

तुझी तबियत कशी आहे? '

आपण जाणतोच, सुदृढ शरीरात निकोप मनाचा वास असतो. प्रथमदर्शनी हे पटण्यासारखे आहे. परंतु शरीर बलदंड करण्यासाठीही मनाची मंजुरी मिळणे अत्यंत महत्वाची असते. ती मिळाली तरच व्यायाम, अन्यथा आराम.   माणसाचे मन आणि मेंदू सक्रिय असेल तर बुद्धी कृतिशील होते आणि जीवनात योग्य ते निर्णय घेतले जातात. अशक्यप्राय वाटणाऱ्या पण आत्मशक्तीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर मरणाच्याही दारातून परत आलेल्या अनेक व्यक्तींना आपण जाणतोच. डोक्यात चुकीचा, नकारात्मक विचार ठाण मांडून बसला असेल तर चांगले परिणाम देऊ शकणार नाही. हे कवी जाणतात. म्हणूनच उपरोधिकपणे "तब्येत कशी आहे?" हे विचारून, 'आधी मनातून भीती काढून टाक' हेही तेवढ्याच आत्मविश्वासाने सांगतात. 

स्वप्ने नेहमीच मानवाला भुरळ घालत आली आहेत. स्वप्ने कधी वास्तवात उतरतात तर कधी वास्तवात आणण्यासाठी आयुष्य अपुरे पडते. पण त्यामुळे माणूस स्वप्नही बघणे सोडत नाही अन् वास्तवात जगणेही. जगण्याचा आनंद घेण्यासाठी समाधानी होणं गरजेचं. अनंत उच्चकोटीच्या इच्छा बाळगणारा मनुष्य जे पदरात पडले त्यालाही गोड मानून समाधानी राहण्याचा प्रयत्न करत असतो. नेमका हाच प्रयत्न त्यांनी  शेरातून सहजपणे मांडला आहे -

'अरे जी वंश वाढवते

परी नाही, बरी आहे! '

जीवनात पतीपत्नी एकत्र येण्याचे प्रयोजन काय? तर वंशवृद्धी आणि आजीवन साथ. त्यासाठी सौंदर्यवती परी काय अन् सर्वसामान्य नारी काय? कुणीही चालेल. कारण सौंदर्य कालबाधित आहे. कायम टिकणारे नाही. म्हणूनच वास्तव स्वीकारून जगले पाहिजे. जीवनात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळतेच असे नाही. पण प्राप्त परिस्थितीत जे मिळाले, जे आहे त्याच्या सहाय्याने ध्येय साध्य केल्या जाऊ शकते हा आशावाद वरील शेर वाचताक्षणीच मनात रुजवतो. 

सृष्टीतील प्रत्येक घटना निश्चित परिणाम साधत असते. आणि असे घडण्यामागे 'कारण' निश्चित असते. हाच नियम आपल्यालाही लागू होतो. 'क्रिया आणि प्रतिक्रिया' यावरूनच आपले सजीवत्व सिद्ध होत असते. सजीवांच्या लक्षावधी जातींमध्ये मनुष्य ही विलक्षण बौद्धिक क्षमता असलेली प्राणिजात. सृष्टीमध्ये जे आहे ते 'सत्य‘ आहे. परंतु मनुष्याने बुद्धी आणि कल्पनाशक्तीच्या बळावर स्वतःचे एक स्वतंत्र 'आभासी विश्व' निर्माण केले आहे. ज्यामध्ये अधिकाधिक गुरफटतो आहे. त्यावर भाष्य करतांना ते लिहितात-

'किती निर्लज्ज टोकाची

इमोजी हासरी आहे '

निर्मिकाने ‘लज्जा आणि हास्य‘ फक्त मानवास बहाल केलेले आहे. परंतु आभासी विश्वात तेही 'सजीवत्व' तो निर्जीवास बहाल करतो आहे. मनात उचंबळून येणारे, चेहऱ्यावरचे भाव 'इमोजी' मध्ये शोधतो आहे. काय ही विडंबना? प्रत्यक्ष भेटीतून ज्ञानेंद्रियांमार्फत सर्वांगास शिरशिरी आणणारा अनुभव निर्जीव इमोजी देवू शकणार का? हा प्रश्न त्यांनाही भेडसावतो आहे. चित्रकाराने चित्र कितीही जिवंत काढले, तरी ते जिवंत नसते. म्हणून 'लज्जा आणि हास्य' हे इमोजी मध्ये न शोधलेले बरे! कदाचित हेच वास्तव आपण स्वीकारले पाहिजे.  वास्तविक 'ॐ नमोजी ' पासून सुरु झालेला मानवाचा प्रवास आभासी 'हम्मम -इमोजी ' वर थांबतो की काय? असा प्रश्न विचारणारा शेर अंतर्मुख करून जातो.

येणारी प्रत्येक नवी पिढी नवीन तंत्रज्ञान, वैज्ञानिक संसाधने यांच्यासह जन्माला येते. तंत्रे आणि यंत्रे सहज वापराची हातोटी त्यांना शिकावी लागत नाही. रोजच्या हाताळण्यातून ते सहज जमतं. त्यामुळे तरुण पिढी उत्साहाने, ऊर्जेने आणि अभ्यासाने ओतप्रोत असली पाहिजे असे जुन्या पिढीला वाटत असते. फारशा सोयी सुविधा नसतांना कमावलेले प्राविण्य, प्रतिष्ठा आणि यश याचा आदर्श त्यांच्यासमोर असतो. परंतु आजच्या तरुणांना हे सर्व सहज उपलब्ध असतानाही ती आळसावलेली दिसते. हीच खरी खंत आहे. याच पिढीला ढोलकीची उपमा देऊन गझलेचा शेवट करतांना ते लिहितात-

'सुरा-तालात का कच्ची

नवी जर ढोलकी आहे '

बदल स्वीकारण्याची आणि करण्याची धमक फक्त तरुण रक्तात असते, त्यामुळे नव्या पिढीने आव्हाने स्वीकारून स्वतःला झपाट्याने बदलत असलेल्या जगासोबत ट्यून केले पाहिजे, असे कवीला वाटते. म्हणूनच त्यांच्यासमोर प्रश्न उभा केला आहे.  त्यांच्यातील उत्सुकतेला, ऊर्जेला आणि समन्वय साधण्याच्या कलेला प्रोत्साहन देत देत आव्हान देण्याचे कामही केले आहे. असा एका दगडात दोन पक्षी मारणारा हा अप्रतिम शेर नव्या पिढीला 'सुरा-तालाचे ' पक्के भान देऊन  जातो. 

श्रीकृष्ण राऊत यांच्या सर्वच गझला आशयाने ओतप्रोत, जीवनाचे तत्त्वज्ञान कमीत कमी शब्दांत, अतिशय सोप्या भाषेत उलगडून सांगणाऱ्या असतात. शेर वाचताक्षणीच तोंडातून आपसूक वाह! निघते. प्रत्येकाच्या अनुभुती विश्वाला एक वेगळा आयाम नव्याने कळलेला असतो. एखाद्या विषयाकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळालेलला असतो. आणि यामुळेच त्यांच्या  शेरातील खयाल भाषिक उपयोजनाच्या दृष्टीने भावनाविष्कार ते सुविचार आणि सुविचार ते सुभाषित या उंचीवर पोहचतो. 

....................................................

प्रा. डॉ. विनोद देवरकर

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा

ईमेल: devarkar28@gmail.com

मोबा.: 9421355073

2 comments:

  1. उत्तम रसग्रहण डॉक्टर

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद सर!

      Delete