१.
खरे तर वाद दोघांचे तसेही लाजमी होते
नको कळवूस दुनियेला उगीचच बातमी होते
मला तू भेटल्यावरती निसटला तोल का नकळत
तुला भेटायच्या आधी तशी मी संयमी होते
सुखी दिसली कधी त्याला, किती नाराज होतो तो
मला जर दुःख झाले तर व्यथा त्याची कमी होते
हिरो झालास तू माझ्या नशीबाच्या सिनेमाचा
मला उशिरा कळाले मी तुझ्यासाठी डमी होते
मला तर एकदाही येत का नाही खरी जोडी
कशी दुःखा तुझी एकाच पत्त्याने रमी होते
जिभेला लावली आहेस इतकी धार तू हल्ली
तुझे समजून घेताना कितीदा मी शमी होते
२.
पुन्हा का तेच ते होते मनाजोगे घडत नाही
फरक पडलाय इतका की फरक काही पडत नाही
किती झाली सवय होती तुझी या दोन डोळ्यांना
अताशा कंठ दाटे पण तरीही मी रडत नाही
कधी काळी हवेसे एकमेकांना किती आपण
अताशा फार माझेही तुझ्या वाचुन अडत नाही
तुला बागेत येणे शक्य नाही आपल्या परतुन
नजर आता तशी पूर्वीप्रमाणे बागडत नाही
जिथे घेऊन शपथा सात जन्माच्या परतलेलो
तिथे तर एक सुद्धा खूण त्यांची सापडत नाही
............................
किर्ती वैराळकर-इंगोले
सुंदर
ReplyDeleteदोन्ही गझला लाजवाब ताई!
ReplyDelete