तीन गझला : अविनाश चिंचवडकर

 



१.

माझ्या मनात आता पेटून आग आहे
आताच या जगाला येणार जाग आहे

जेथे कळ्याच साऱ्या तोडून टाकलेल्या
येथे अशी अनोखी शोभून बाग आहे

आता उरात साऱ्या दाबून हुंदक्यांना
हासून गीत गाणे ओठांस भाग आहे

कानात चांदण्यांच्या सांगून रात्र गेली
चंद्रास या कधीचा लागून डाग आहे

राहू कसा कळ्यांच्या मी आज सोबतीला?
जेव्हा कुणी शिकारी काढून माग आहे

२.

हा भार वेदनांचा मी वाहणार नाही
मागे वळून आता मी पाहणार नाही

सोसायचा किती हा अंधार जाणिवांचा
अन्याय हा युगांचा मी साहणार नाही

ही लेखणीच जेव्हा होईल पारखी मज
तेव्हा उगीच काही मी रेखणार नाही

केले कितीक वेळा उध्वस्त ज्या विषाने
तो घोट आसवांचा मी प्राशणार नाही

माझ्या नवीन वाटा; माझे नवे किनारे
माझ्या मनात आता मी राहणार नाही

३.

जो वार होता; हळुवार होता
माझ्यावरी हा उपकार होता

ते प्रेम खोटे, फसवे दिखाऊ
तो चोख त्यांचा व्यवहार होता

आधार तू तो एकदा दिलेला
होता क्षणांचा पण फार होता

दाटून येते सय काळजाशी
हा घाव त्यांचा दिलदार होता

माझा म्हणूनी जोपासलेला
तोही न माझा अधिकार होता
.................................
अविनाश चिंचवडकर,
बंगलोर
avinashsc@yahoo.com
9986196940

1 comment: