तीन गझला : निलेश कवडे




१.

तिला वाटते जग केवळ त्याच्या रंगाचे आहे
सापडलेले मोरपीस म्हणते कृष्णाचे आहे

धोक्याचा बदला घेण्याची होतच नाही इच्छा
तुझ्या कपाळावर कुंकू माझ्या मित्राचे आहे

दंगलीत ना जळले कारण, त्यांना कळले नाही
दारावर पाटी नसलेले घर कोणाचे आहे

काय करू शिकवू की नाही? तिला आणखी आता
समाज म्हणतो, तुझ्या मुलीचे वय लग्नाचे आहे

अतूट अपुल्या मैत्रीविषयी दुनियादारी म्हणते,
टिकून आहे नाते कारण बिनकामाचे आहे

इथे कुणीही आनंदाचे कारण शोधत नाही
प्रत्येकापाशी केवळ कारण दुःखाचे आहे

तेव्हा एकाही दगडाला, त्यांनी पुजले नाही
हे मोठे ऋण विज्ञानावर, अश्मयुगाचे आहे

२.

मने जिंकणे शिकले आहे, या हृदयाने माझ्या
वैर बदलते मैत्रीमध्ये, प्रतिसादाने माझ्या

सदा सोबतीला मित्रांची, दस्ती असते म्हणुनी
कधीच अश्रू पुसले नाही मी हाताने माझ्या

जन्मभर इथे देह झिजवला, मी ज्या वलयासाठी
जगू दिले ना मनासारखे, त्या वलयाने माझ्या

नवऱ्याचे आडनाव लावुन, तू भले मिरव तोरा!
आजही तुला ओळखले जाते नावाने माझ्या

असलो साधा नागरिक तरी मी साधारण नाही
दिल्लीचेही तख्त बदलते आवाजाने माझ्या

कधीच अश्रूंना जातीचा रंग वगैरे नसतो
मला शिकवली ही दुनियादारी बापाने माझ्या

लेक जन्मली घरात माझ्या तसे उजळले जीवन
ही अनुभवली खरी दिवाळी, आयुष्याने माझ्या

तग धरुनी वादळात होतो, जबाबदारीने मी
काही पक्षांचे घर होते आधाराने माझ्या

मी रागावत नाही हल्ली, राग टाळतो हसुनी
बरेच काही गमावले आहे रागाने माझ्या

किती वाढली दाखवू नका इमारतींची उंची
तुमच्‍या शहराचा पाया रचला गावाने माझ्या

वयाच्या अशा टप्प्यावर मी, पोहचलो आहे की
फरक पडत नाही आता असल्या-नसल्याने माझ्या

३.

मातीमध्ये रुजणे जमले त्याला जगता येते
जगणाऱ्याला पुन्हा नव्याने, येथे फुलता येते

कधीही करू नकोस मित्रा परिस्थितीचा बाऊ
युद्ध शेवटी तोच जिंकतो ज्याला लढता येते

वादळात उन्मळून गेले जिद्द कुठे उन्मळली
तग आशेवरती जगण्याच्या अविरत धरता येते

ऐकवले ना सृष्टीला मी दुःखाचे रडगाणे
जगता जगता बघ जगण्याचे गाणे रचता येते

आयुष्याच्या प्रश्नावरती दिले कळीने उत्तर
काट्यांमध्ये राहुन सुद्धा मला उमलता येते

किती दिवस राहणार आहे पानगळीचा मौसम
श्रावणामधे आयुष्याला पुन्हा बहरता येते

आयुष्याच्या कॅनव्हासला, बघ रंगवता येते
मोहरता मोहरता मजला, दुःख विसरता येते 
 
-  निलेश कवडे 

No comments:

Post a Comment