१.
नको समजू प्रजेला फार तकलादू
जपावा तू तुझा दरबार तकलादू
किती मजबूत केले मी उभे सारे
निघाला पण तुझा आधार तकलादू
तुझा तू ठोस करतो फायदा आधी
भले मग ठेवतो व्यवहार तकलादू
शरीराने जरी तलवार झेलावी
विचारांना सुई टुचणार तकलादू
खरोखर ठाम होता जेवढा पाया
निघाले तेवढे घरदार तकलादू
जराशा काजव्याने छेद जर पडतो
नको मिरवू तुझा अंधार तकलादू
तुझ्या एका स्मृतीने लाख तुटलो मी
तुझा आहे दिवाणा ठार तकलादू
तडकले संकटाच्या फक्त टिचकीने
भरोस्याचे निघाले यार तकलादू
क्षणार्धातच उडाला फ्यूज नात्याचा
मनाच्या आतली जर तार तकलादू
२.
फुलू देऊ नका,रोका फुलांना
सुगंधाचा खरा धोका फुलांना
फुले करतील वाऱ्याला सुगंधी
हवेने जर दिला झोका फुलांना
फुलांची माळ बघ पदरात शिरली
अरे कोणीतरी टोका फुलांना
पुन्हा ती माळते चुंबून गजरा
चिडवण्याचा पुन्हा मोका फुलांना
गुलाबाचे करा मुद्दाम तांबुल
हवे मग तेवढे ठोका फुलांना
३.
वाटतोय मी किती नितळ मला
दुःख देवुनी पुन्हा घुसळ मला
जळजळाट खोलवर तुझा किती
खळखळाट लाभला उथळ मला
लागले मनात जर शिजायला
एकटक बघून तू उकळ मला
लाजला अखेर वाकडेपणा
भेटले कधी कुणी सरळ मला
शुद्ध यायची न जन्मभर तुला
एकदा नशेमधे मिसळ मला
मी मनास आरपार खोदले
लागला तरी तुझा न तळ मला

भन्नाट गझला फारच खूप खूप आवडल्या
ReplyDeleteगझला खूपच छान. पहिल्या दोन गझलांमधला हटके रदीफ सुंदर निभावलाय.
ReplyDelete- विजयानंद जोशी.