१.
घे तुझा तू चंद्र अन् दे चांदणे माझे मला
जेवढे आकाश माझे तेवढे तू दे मला
सावल्यांच्या पावलांवर चालुनी दमलो अता
घे तुझा तू सूर्य पण, दे कवडसे थोडे मला
ओळखीचा वाटतो का सांग ना आता तरी
शोधती परक्यापरी का हे तुझे डोळे मला ?
जे मला कळणार नाही ते नको बोलूस तू
ते तुझ्या मौनातले ना सोडवे कोडे मला
जाहली नात्यातली का ओढ आता पारखी?
स्पर्श दोघांचा किती हा कोरडा वाटे मला ?
मी तुला स्मरतो कसा त्या नेमक्या हळव्या क्षणी
कोणत्या बंधात आपण,का असे होते मला ?
पाहुनी माझी दशा ही, शब्द आले धावुनी
कोण हे सुचवून गेले शेवटी गाणे मला ?
२.
आर्त गाऊन जा, भान हरपून जा
काळजाची व्यथा खोल उसवून जा
स्पंदनांना कळे कोण कोठे जळे
ज्योत होऊन तू, प्राण उजळून जा
गीत झंकारले, शब्द नादावले
तार छेडून जा, ताल बदलून जा
रात्र माझी तुझी धुंद कोजागिरी
चांदण्यांच्या उरी गंध पसरून जा
आज आली अशी नीज हळव्या क्षणी
चंद्र माळून जा, रात्र उजवून जा
३.
जशा ऐकल्या आर्त गंधारमाला
तशा जाहल्या यातना काळजाला
तुझे मौन जेव्हा भिडे या मनाला
नको वाटती शब्दही सांत्वनाला
युगांचा दुरावा, युगांचा अबोला
अता बोलण्याच्या अपेक्षा कशाला ?
तुझी चूक की, चूक माझी कळेना
कळेना अता दोष देऊ कुणाला ?
निघू पार या अग्निदिव्यातुनीही
वदंता जरी आज आल्या भराला !
बरा होत गेलो खरा होत गेलो
दिले श्रेय याचे स्वतः मी स्वतःला
तीनही गझला अप्रतिम आहेत. अभिनंदन!
ReplyDeleteतीनही सुंदर
ReplyDelete