१.
आत माझ्या वेदनेचे एक मोठे गाव होते
सांगताही येत नाही काय त्याचे नाव होते
चोर-चिलटे राज्यकर्ते खात होते तूप रोटी
गाढ तेव्हा झोपलेले पाहिले मी साव होते
साखरेला गोड भारी ऐकले मी बोल त्यांचे
जे मला नाही उमगले ते कूट त्यांचे डाव होते
चार भिंती आत माझा रोज होता कोंडमारा
चेहर्यावर आणलेले मी फुकाचे भाव होते
सांत्वनाचे बोल त्यांचे मी खरे मानू कसे रे
खेचणारे तेच मागे ना कुठेही नाव होते
२.
उपवास रोज घडतो, नसतो फराळ कुठला
चतकोर भाकरी दे, अन् मोक्ष ठेव तुजला
गर्भातल्या कळीला तोडून टाकले अन्
व्याकूळ माय कुढते पान्हा अजून फुटला
उत्तम जगात शेती सांगू नका कुणाला
ना आजही बळीचा कुठलाच प्रश्न सुटला
प्रश्नास भाकरीच्या शाळाच फक्त उत्तर
शिकला नसेल शाळा अनुकंप त्यात रुजला
सोसून घाव त्याने मानव्य सिद्ध केले
नाजूकश्या फुलांनी, पाषाण देह पुजला
गावात बाप त्याचा पाण्याविणाच गेला
मुलगा अता कशाला त्याला तुम्हीच उचला
३.
आकाश मोकळे दे घेईल ती भरारी
पंखास फक्त बळ दे व्यापील विश्व नारी
सुंदर कलाकृतीचे निर्माण विश्व करते
सन्मान देत जाऊ घेईल मग उभारी
लाचार आज आहे आई कुणा म्हणावे
मागे वळून बघतो मी मोकळ्याच दारी
पाऊल वामनाचे खंबीर तूज जवळी
मर्यादशील जीवन त्यागून हो करारी
तो बंधनात पडला आहे जरी विधाता
धनवान मी तरीही आईविना भिकारी
सुंदर गझला! हार्दिक अभिनंदन
ReplyDeleteमनापासून धन्यवाद सर🙏
Deleteखूप छान , मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन.!
ReplyDeleteबढिया
ReplyDelete