तीन गझला : भागवत देवकर

१.

व्यथेचे मुख्य कारण आहे
इच्छा माझी गाभण आहे

जीवन म्हणजे काय नेमके
सुखदुःखाचे सारण आहे

कढीभातही विटून गेला
फक्त ऐकले भाषण आहे

सूर्या लवकर मावळ लेका
पेटून उठले अंगण आहे

जवळच मुलगी खेळत आहे
निरोप देते पैंजण आहे

२.

भावनांनी लादल्यावर पोरकेपण
मग खरे मजला उमगले एकटेपण

जीवनी येऊन जा कायम व्यथांनो
वाढले तर वाढले मग आपलेपण

नाव कमवाया किती तो वेळ जातो
नाव गमवाया पुरेसे वेंधळेपण

पाहिजे नाविन्य  जर येथे जगाला
तू तुझे मित्रा जपावे वेगळेपण

शोधतो पर्याय आहे खूप सखये
भेटले नाही कुणी तुज सारखे पण

३.

हातचे थोडे तरी राखून ठेवावे
व्यंग मित्रा नेहमी झाकून ठेवावे

एकतर कामात यावा ए असो की बी
प्लान सारे नेमके आखून ठेवावे

संकटाने घाबरावे पाहुनी त्यांना
मार्ग आपण एवढे शोधून ठेवावे

आसवासोबत कधी वाहू नका देऊ
स्वप्न डोळ्यातील सांभाळून ठेवावे

वाच्यता होऊ नये कुठल्या प्रकाराची
निंदकांचे तोंडही दाबून ठेवावे

8 comments: